Pune News : गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा कुटुंबियांना संशय

एमपीसी न्यूज : मागील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गौतम पाषाणकर यांचा शोध अजूनही लागला नाही. या प्रकरणाला आता नवं वळण लागले असून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा बेपत्ता होण्यामागे एका बड्या राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत धाव घेतली असून तक्रार दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

मागील बुधवारपासून (21 ऑक्टोबर) बेपत्ता असलेल्या गौतम पाषाणकर यांचा सात दिवसानंतर ही शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पाच पथके आणि शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक सातत्याने काम करत आहे. ते ज्या ज्या ठिकाणी गेलेत अथवा या ठिकाणी जाण्याची संभावना आहे अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक गोष्टींच्या सहाय्याने पोलिस त्यांचा तपास घेत आहेत.

गौतम पाषाणकर हे पाषाणकर ऑटोचे  व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिकही आहेत. बुधवारी दुपारी ते लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्यानंतर तेथून ते जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी मोटार चालकाला एक लिफाफा ताब्यात देऊन घरी देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी चालकाला तुझे काही काम असेल तर करून ये असे सांगत मी पायी घरी येतो असे  सांगितले. त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला. पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांनी व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत  असल्याचे नमूद केले आहे.

गौतम पाषाणकर कुणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (020 – 25536263) या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.