pimpri : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात

निवडणुकीची अधिसूचना उद्या होणार प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 4 ऑक्टोबर आहे. दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतरच प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवार (दि.21) पासून लागू झाली आहे. निवडणुकीची अधिसूचना उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 4 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान असून  24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथून होणार आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, अर्ज स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावरुन होणार असल्याचे चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार यांनी सांगितले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील इमारतीमध्ये होणार आहे, अशी माहिती भोसरीच्या निवडणूक निर्णय अधिकरी रेश्मा माळी यांनी दिली.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची अद्यापपर्यंत घोषणा झाली नाही. एकाही प्रमुख पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत. उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. परंतु, शनिवारपर्यंत पितृपक्ष आहे. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतरच युती आणि आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. त्यामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल.

‘असा’ आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना – 27 सप्टेंबर 2019
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस – 4 ऑक्टोबर 2019
उमेदवारी अर्जांची छाननी – 5 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – 7 ऑक्टोबर
मतदान – 21 ऑक्टोबर
मतमोजणी – 24 ऑक्टोबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे – 27 ऑक्टोबर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.