Vadgaon Maval News : एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील संपादित जमिनींच्या मोबदल्याचा पहिला हप्ता दिवाळीपर्यंत मिळणार 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला तातडीने मिळावा यासंदर्भात माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दिवाळीपर्यंत मोबदल्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून बाधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी राज्यमंत्री भेगडे यांच्यासह शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम, नथु थरकुडे, गणेश कल्हाटकर, गणेश भांगरे, संतोष जाचक,सचिन पांगारे यांनी बुधवारी (दि 13) एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनबलगन यांची मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी बोलताना एमआयडीसी टप्पा 4 मधील निगडे, आंबळे कल्हाट, पवळेवाडी या गावातील शेतकऱ्यांना जमिनी संपादित झाल्या असून फक्त आंबळे गावचे 32(1) प्रक्रिया झाली आहे तर इतर गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अडकल्यामुळे व पुढची प्रक्रिया रखडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे माजी राज्यमंत्री भेगडे यांनी सांगितले.

तसेच 32(1) झालेल्या आंबळे गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला तात्काळ द्यावा व इको सेन्सिटिव्ह झोन वगळण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा अशीही सूचना भेगडे यांनी यावेळी मांडली. यावर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी मोबदल्याचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी देऊ असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.