Chikhali : चिखली पोलीस ठाण्याची पहिली कामगिरी; दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला अटक

सहा जणांकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रोकड रात्री लुटण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रिगल पेट्रोल पंपाजवळ वडाचा मळा, चिखली येथे केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 66 हजारांचा ऐवज जप्त केला. अन्य दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीमुळे चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपासाची सुरुवात झाली आहे. पहिल्याच तपासात दरोड्यासारखे गुन्हे उघडकीस आणल्याने नागरिकांच्या चिखली पोलिसांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
अश्वजीत सुभाष मोरे (वय 19, रा. घरकुल, चिखली. मूळ रा. कदमबावरे, ता. मुळशी), सचिन विक्रम म्हस्के (वय 20, रा. सावरकर चौक, मोरे वस्ती, चिखली. मूळ रा. कागदी गोलेगाव, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर श्रीराम ढाकणे (वय 20, रा. घरकुल, चिखली. मूळ रा. बावे, ता. शिरूर, जि. बीड), साजिद मुमताज खान (वय 19, रा. घरकुल, चिखली), आतिष बलदेव कोरी (वय 20, रा. घरकुल, चिखली), विकास उर्फ पांग्या जाधव (रा. शरदनगर, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू-आळंदी रोडवर वडाचा मळा येथे जाधववाडीकडे जाणाऱ्या रोडवर रिगल पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ काही तरुण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये घातक शस्त्रे असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेत त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार, दोन कोयते, एक चाकू, तीन मोबाईल फोन, तीन दुचाकी असा ऐवज जप्त केला. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता ते रिगल पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रोकड लुटण्याचा तयारीत असल्याचे आरोपींनी सांगितले. यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला. या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एमआयडीसी भोसरी, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यातील तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून एकूण 2 लाख 66 हजार 630 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या करवाईमध्ये एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे, पोलीस उपनिरीक्षक भरत चपाईतकर, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, किसन वडेकर, आनंद चव्हाण, सुनील शिंदे, नरहरी नानेकर, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, आनंदा नागरे, शंकर यमगर, सुरेश जाधव, साकोरे, विनोद जाधव, सचिन गायकवाड, किशोर धनवडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.