Bhosari : प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही – आमदार महेश लांडगे

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरशेन आणि आमदार महेश लांडगे यांच्या वतीने सोसायट्यांशी परिसंवाद

एमपीसी न्यूज – चिखली, मोशी भागात नागरिकांच्या विविध समस्या आहेत. अनेक दिवसांपासून त्या सोडविण्यासाठी मी आणि माझ्यासोबत आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. काही समस्या अजूनही डोके वर काढून आहेत. त्यांना मुळापासून संपवण्यासाठी आपण प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करतच राहणार आहोत. प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि आमदार महेश लांडगे यांच्या वतीने चिखली, मोशी भागातील नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे बोलत होते. यामध्ये आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या बाजूने प्रशासनाकडे विविध समस्यांबाबत विचारणा केली. तसेच नागरिकांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील असे आश्वासन दिले.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता मकरंद निकम, राजन पाटील, राजेंद्र राणे, संजय घुबे, राजेर पवार, संजय कुलकर्णी, श्रीकांत सावने, फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, सचिव संजीवन सांगळे, नगरसेवक, नगरसेविका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, फेडरेशनच्या वतीने, विविध सोसायट्यांच्या वतीने अनेक समस्या मांडण्यात आल्या. या समस्या कोणत्याही नागरिकाच्या व्यक्तिगत समस्या नाहीत. त्या संपूर्ण परिसराच्या आणि समाजाच्या समस्या आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो, तो परिसर आणि समाज स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित असायला हवा, एवढीच माफक अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे. मी त्यांच्या समस्यांचा स्वीकार करतो. ज्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत त्या सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करणार आहे. जनतेने दिलेल्या जबाबदा-यांपासून मी पाळणार नाही.

रस्ते, स्वच्छता, कचरा, पाणी, प्रदूषण या प्रमुख समस्या इथल्या नागरिकांच्या आहेत. त्या पूर्णपणे सोडविण्यात येणार आहेत. परंतु या सोडवत असताना भविष्याचा, येणा-या पिढ्यांचा विचार करून सोडविल्या जाणार आहेत. समस्यांवर तात्पुरता नाही तर शाश्वत उपाय करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा याच समस्या घेऊन येणा-या पिढीला अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित करण्याची गरज भासणार नाही, असेही आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना विविध विभागांच्या अधिका-यांना ठराविक वेळ देऊन त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. परिसरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी एक महिन्यात उपाययोजना करावी. च-होली, मोशी, चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरु आहेत. काही रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. ती येत्या 15 दिवसात करून घ्यावी. पुरेशी पार्किंग नसल्याची विविध सोसायट्यांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना योग्य ते आदेश देऊन प्रसंगी त्यांच्या परवानग्या नाकारून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी यावेळी प्रशासनाला दिले.

‘पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी सर्वांची साथ महत्वाची आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 3 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उत्तम रस्ते, फूटपाथ, दवाखाने, शाळा, बगीचे निर्माण केले जाणार आहेत. स्मार्ट सिटीत कचरा देखील स्मार्ट पद्धतीने गोळा केला जाणार आहे. हिंजवडीसाठी मोशी काळेवाडी फाटा मार्गे इलेक्ट्रिक एसी बस लवकरच सुरु होणार आहे. महापालिकेने एक हजार बसची मागणी केली असून काही बस मिळाल्या आहेत. आधुनिक पद्धतीने एसटीपी प्लांट सुरु केले जातील. ज्यामुळे ते सोसायटीच्या जवळ नकोसे वाटणार नाहीत. प्रदूषण, आगीच्या घटना, कचरा, भंगार व्यवसाय यावर तोडगा काढण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.