Talegaon MIDC : फोनवर शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून चौघांना कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – गैरसमजातून फोनवर शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या चार जणांना 11 जणांनी मिळून कोयत्याने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मावळ तालुक्यातील जांबवडे गावात रविवारी (दि. 28) दुपारी घडली.

कृष्‍णा गंगाराम चव्हाण (वय 23, रा. डमडेरे, ता. शिरूर), संतोष मोहिते, रमेश सर्जेराव चव्हाण, सर्जेराव लक्ष्मण चव्हाण अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा चव्हाण यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अरुण बबन राठोड (वय 33), किशोर बबन राठोड (वय 26), किरण बबन राठोड (वय 24), पूजा किरण राठोड (वय 22), सिंधू अरुण राठोड (वय 30), पूजा किशोर राठोड (वय 24), रमाबाई बबन राठोड (वय 50), अनिता बबन राठोड (वय 30), सोनी दीपक मोहिते, विनोद बाळू पवार, प्रकाश बाळू मोहिते (सर्व रा. जांभवडे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किशोर बबन राठोड आणि किरण बबन राठोड या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये गैरसमजुतीतून फोनवर शिवीगाळ आणि दमदाटीचा प्रकार झाला होता. या प्रकाराबद्दल फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी किरण बबन राठोड यांच्या घरासमोर गेले. त्यावेळी आरोपी अरुण राठोड, प्रकाश मोहिते, किरण राठोड आणि किशोर राठोड यांनी ‘तुम्हाला जीवे मारतो.

एकाला पण जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून घरातून कोयता घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी कृष्णा तसेच त्यांचे नातेवाईक संतोष मोहिते यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर, रमेश चव्हाण यांच्या डोक्यात आणि पाठिवर, तर सर्जेराव चव्हाण यांच्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ आणि दमदाटी करून हाताने व दगडाने मारहाण केली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.