Talegaon : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुंडा विरोधी पथकाने शिर्डीतून ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – सन 2022 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला आरोपी पसार झाला होता. त्याला गुंडा विरोधी पथकाने शिर्डी येथून अटक केली. त्या आरोपीवर सन 2013 ते 2022 या कालावधीत गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
अमर अशोक चव्हाण (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तळेगाव दाभाडे (Talegaon) पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2022 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये अमर चव्हाण हा आरोपी होता. दरम्यान त्या गुन्ह्यात अमरसह त्याच्या अन्य साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यातही अमर चव्हाण फरार होता. गुंडा विरोधी पथकाने अमर चव्हाण याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून ठावठिकाणा शोधून काढला. अमर चव्हाण हा शिर्डी येथे लपून बसला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली.
गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांनी एक टीम तात्काळ शिर्डी येथे रवाना केली. तिथून पोलिसांनी अमर चव्हाण याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्यावर सन 2013 मध्ये हवेली पोलीस ठाण्यात एक आणि त्यानंतर सन 2022 पर्यंत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, सहायक फौजदार प्रवीण तापकीर, पठाण, पोलीस अंमलदार शुभम कदम, ठोकळ, मेदगे यांनी ही कारवाई केली.
https://youtu.be/mXlMtg2dukE