Pimpri : खेळामुळेच कठीण प्रसंगावर मात करणे शक्‍य – स्वाती घाटे

एमपीसी न्यूज – जीवनात अनेक वेळा कठीण प्रसंग येतात. त्यातूनच माणसाची जडणघडण होते. बुध्दीबळासारख्या खेळामध्ये प्रतिस्पर्धीची पुढील चाल काय असेल, याचा विचार करून आपल्या खेळाची योग्य दिशा ठरवावी लागते. यामुळेच आयुष्यातील कठीण प्रसंगावर तार्कीक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता वाढते, असे मत महिला ग्रॅण्डमास्‍टर स्वाती घाटे यांनी व्यक्‍त केले.
पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी केले आहे. त्याअंतर्गत 12 जानेवारी 2019 ला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात बुध्दीबळ आणि कॅरम स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी बुध्दीबळपटू स्वाती घाटे, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू योगेश परदेशी, अभिजीत त्रिपणकर यांनी शुक्रवारी (दि. 4 जानेवारी 2019) गंधर्व हॉल, चापेकर चौक, चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेचे नियम, अटी, गुणांकन पध्दती याविषयी माहिती दिली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड. सचिन पटवर्धन, संजय मंगोडेकर उपस्थित होते. बुध्दीबळ मार्गदर्शक दिनेश भागवत, कॅरम मार्गदर्शक रावसाहेब कानवडे यांनी उपस्थित खेळाडूंना खेळाचे नियमांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांना महिलांच्या प्रती आदर राखण्याची व शरीरास अपायकारक असलेल्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना योगेश परदेशी म्‍हणाले, कोणत्याही खेळासाठी नियमीत सराव आवश्यक असतो. सरावामुळे आपल्यातील गुण-दोषांची माहिती होते. खेळातील आपली बलस्थाने समजतात. नियमीत सराव केल्‍यास कोणत्याही खेळाडूला यशाला गवसणी घालणे शक्‍य होते. खेळाने मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्ती राखता येते. अनुभवातुनच माणूस घडत जातो. त्यातूनच चॅम्पियन घडतात, असे परदेशी यांनी सांगितले.
ॲड. सचिन पटवर्धन प्रास्ताविकात म्‍हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील मुलांना कला, क्रीडा प्रकारातील आपले नैपुण्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कर्तव्य फाऊंडेशन कार्य करत आहे. फाऊंडेशन 28 कला, क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा घेत असून यामध्ये शहरातील युवकांनी सहभागी व्हावे. या फेस्टिव्हल मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 45 शाळा, महाविद्यालयांमधील 2500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. फाऊंडेशन कला, क्रीडा मार्गदर्शन, स्पर्धा याबरोबरच विविध विषयातील देशातील तसेच परदेशातील शिक्षण संधी, संरक्षण क्षेत्रातील संधी, महिला, युवकांसाठी स्वयंरोजगाराची क्षेत्रे, शासनामार्फत चालवल्या जाणा-या सरकारी योजना आदींबाबत मार्गदर्शन करते, असे पटवर्धन यांनी सांगितले.
यावेळी स्वाती घाटे यांनी एकाच वेळी अनेक खेळाडूंशी बुध्दीबळाचा डाव खेळला, तर योगेश परदेशी, अभिजीत त्रिपणकर यांनी उपस्थितांना कॅरमच्या खेळाची चुणूक दाखवली. सुत्रसंचालन राजेश पाटील, आभार संजय मंगोडीकर यांनी मानले. कार्यक्रमास खेळाडू, त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.