Chinchwad : वाहनांच्या काचा फोडून ऐवज चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

18 लॅपटॉपसह पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेणा-या एका टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून तब्बल 18 लॅपटॉप, 3 वायफाय डोंगल, एक कॅमरा लेन्स, 7 लॅपटॉप बॅग, दोन दुचाकी असा एकूण 12 लाख 77 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश उर्फ नाना माणिक पवार (रा. नवी मुंबई), बबन काशिनाथ चव्हाण (वय 39, रा. ति-हे तांडा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), बसू जगदीश चव्हाण (वय 45, रा. सुरक्षा नगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राजेश प्रकाश चव्हाण (वय 35, रा. अंबुजवाडी, मालवणी, मालाड, मुंबई), मारुती मानी पवार (वय 40, रा. पाणी इपरगा तलाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे त्यांचे साथीदार फरार आहेत.

आरोपींनी चोरलेला माल विकत घेणा-यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साहेबराव गुंड (रा .शिवनी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), सुलेमान याकुब तांबोळी (रा. विष्णू नगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

6 ऑक्टोबर रोजी हिंजवडी परिसरातून मिलिंद वेदव्यास राळेगावकर (वय 48, रा. सुसगाव) यांच्या होंडा सिटी कारच्या काचा फोडून चोरट्यांनी 50 हजारांची बॅग चोरून नेली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस करीत होते.

तपास करत असताना पोलीस नाईक वासुदेव मुंडे आणि पोलीस शिपाई आदिनाथ ओंबासे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक दुचाकी संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची तपासणी करून दुचाकीचा शोध घेतला. ती दुचाकी आरोपी गणेश याची असल्याचे निष्पन्न झाले. गणेश हा मुंबई पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याला रबाळे, नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले.

गणेश याने त्याच्या बबन आणि बसू या दोन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी दोघांना हडपसर आणि सोलापूर येथून ताब्यात घेतले. तिघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या राजेश आणि मारुती या दोन साथीदारांसोबत मिळून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दीड वर्षांपासून 25 ते 30 वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली.

चोरी केलेले लॅपटॉप हे सोलापूर येथील अमोल आणि सुलेमान यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीचे सामान विकत घेणा-या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 18 लॅपटॉप, 3 वायफाय डोंगल, एक कॅमरा लेन्स, 7 लॅपटॉप बॅग, दोन दुचाकी असा एकूण 12 लाख 77 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चोरीचे काही लॅपटॉप फरार आरोपी राजेश आणि मारुती यांनी मुंबई येथे विकल्याचे सांगितले आहे.

या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील सात, वाकड पोलीस ठाण्यातील तीन, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एक आणि हडपसर पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक केलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी गणेश याच्यावर मुंबई शहर येथे 24 गुन्हे दाखल आहेत. तो डिसेंबर 2019 मध्ये ख्रिसमस कालावधीत त्याच्या इतर साथीदारांसोबत गोवा राज्यात वास्तव्य करत होता. तिथेही त्याने अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गोवा पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोपी बसू चव्हाण याच्यावर मुंबई शहर आणि पुणे शहर येथे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई शहरातून तडीपार करण्यात आले आहे. त्यानंतर त्याने आपले बस्तान पुणे शहरात बसवले. तर फरार आरोपी राजेश पवार आणि मारुती चव्हाण यांच्यावर अनुक्रमे 27 आणि 3 गुन्हे दाखल आहेत.

जप्त केलेल्या 18 लॅपटॉप पैकी 6 लॅपटॉपच्या मूळ मालकांचा शोध लागला आहे. 12 लॅपटॉपच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. वाहनाची काच फोडून लॅपटॉप चोरी गेल्याचा प्रकार घडला असल्यास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चार च्या पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवटे, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, राजेंद्र शेटे, अतुल लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.