Pune : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी गजाआड

शहरात 70 जणांची टोळी फिरत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश  आले आहे. फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून पाठलाग करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

बबलू हरेश शेख (वय 45, रा. दिल्ली), सेतु आबु मतुबूर (वय 20, रा. गुवाहाटी आसाम), सिंतू मुतालिक शेख (वय 36 रा. अजमेर, राजस्थान), रिदोई महमंद रहीम खान (वय 19, रा. नवी दिल्ली), असे या चारही आरोपींची नावे आहेत. तर कबीर इस्माईल शेख व झांगी नावाची महिला फरार झाली. याप्रकरणी आशिष विजय चव्हाण (वय 39, रा. आंबेगाव खुर्द), यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादी आशिष यांचे बुधवार पेठ येथे चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी बबलू त्यांच्या दुकानात बूट खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने साडेसातशे रुपयांचे स्पोर्ट्स शूज विकत घेतले. शुजचे पैसे दिल्यावर त्याने 20 डॉलरची नोट दाखवून आशिष यांना ती तुमच्याकडे चालते का विचारले. आशिष यांनी नकार दिला. यावेळी आरोपी बबलू याने या डॉलरची किंमत 70 रुपये असून मी तुम्हाला ती 30 रुपयात देतो असे सांगून खिशातील आणखी डॉलर काढून त्यातील एक नोट आशिष यांना देऊन स्वतःचा फोन नंबर दिला.

आशिष यांनी ही नोट खरी आहे का याची आपल्या परिचितांकडून खात्री केली. नंतर बबलू याला फोन केला. त्याने 6 जूनला आशिष यांना डॉलर पाहण्यासाठी दांडेकर पुलाजवळ बोलावले. त्याने आशिषला कॅनॉलकडे नेऊन तेथे अमेरिकन डॉलर दाखविले. त्यावर फिर्यादींचा विश्वास बसल्याने त्यांच्यात दीड लाख रुपयात 500 डॉलर देण्याचा व्यवहार ठरला.

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे 8 जूनला आरोपी हे श्रीकृष्ण टॉकिज बुधवार पेठ पुणे येथे आला. त्याने आशिष यांना फोन करून डॉलर आणल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आशिष श्रीकृष्ण टॉकिजजवळ गेले असता आरोपीने अमेरिकन डॉलर असलेली कॅरीबॅग आशिष यांना दिली व त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन निघून गेला. आशिष यांनी दुकानात येऊन कॅरिबॅग पाहिली असता त्यात त्यांना फक्त 20 डॉलरची एक नोट व बाकी सगळे कागदी गुंडाळी असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज मिळवून आशिष यांना दाखवले असता त्याने आरोपी बबलू यांना ओळखले. त्याआधारे तपास करताना फरासखाना पोलिसांना आरोपी हे जनता वसाहत दांडेकर पूल येथे असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करीत चौघांना अटक केली. तर दोघेजण फरार झाले.

अशा प्रकारे तब्बल 70 जणांची टोळी पुणे शहरात फिरत असल्याचा अंदाज व्यक्त करीत पोलिसांनी वागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.