Kalewadi Crime News : बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी गजाआड 

1 लाख 21 हजार 580 मुद्देमाल जप्त 

एमपीसी न्यूज – आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने काळेवाडी येथील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून टोळीला अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत आठशे लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

राहुल गौड (वय 33, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय 23, रा. संदीपनगर, थेरगांव), तुकाराम अर्जुन मगर (वय 30, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय 25, रा. राशे फाटा, चाकण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 1 लाख 21 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल, बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, झेरॉक्स मशीन यासह काही सर्टिफिकेट, एक मोबाईल आणि रबरी स्टॅम्प असं साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने काळेवाडीतील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड हा त्याच्या इतर पाच साथीदारांसह बनावट कागद पत्र तयार करत होता.

यात, आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे संगणकावर बनवली जात होती. आरोपी राहुल ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत त्यांच्याशी संपर्क करुन व्हाट्सऍपवर नाव आणि पत्ता घ्यायचा, त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिली जायची. याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली .

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.