Pimpri: महापालिकेची महासभा महिनाभरासाठी तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिनाभराची महासभा एक महिनाभर लांबणीवर टाकली आहे. दिवंगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहून सभा 20 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सभा आज (मंगळवारी)आयोजित केली होती. परंतु, महापौर राहुल जाधव परदेश दौ-यावर आहेत. उपमहापौर सचिन चिंचवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे सत्ताधा-यांनी कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब केली.

सभेच्या सुरुवातीला येत्या 31 नोव्हेंबरला महापालिका सेवेतून निवृत्त होणारे कार्यकारी अभियंता विशाल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिवंगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आबा अभ्यंकर यांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्याला नगरसेवक नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी  महासभा 20 डिसेंबर दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.

पिंपरी-चिंचवड शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सह शहर अभियंतापदी मकरंद निकम यांना बढती देणे, आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेला मंजुरी देणे, पीएमपीएलच्या बस पार्किंगसाठी महापालिका मुख्यालयासमोरील जागा देणे, महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय(वायसीएम) मधील मल्टिप्लेस हायड्रोलिंक ऑक्‍सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिमसाठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्वावर चालविण्यासाठी देणे हे विषय महासभेपुढे  होते. सभा तहकूब केल्यामुळे हे विषय एक महिना  लांबणीवर पडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.