Pimpri : देशातील नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकार योग्य प्रयत्न करीत आहे – खासदार अमर साबळे

एमपीसी न्यूज – भारतात सध्या मंदीचे सावट पसरले आहे. मुख्यतः वाहन उद्योग क्षेत्रात हे मंदी प्रकर्षाने जाणवत आहे. नागरिकांची क्रयशक्ती कमी झाल्याने ही मंदी आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकार योग्य प्रयत्न करीत आहे. यामुळे मंदीचे सावट लवकरच दूर होणार आहे, असा विश्वास राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापौर राहुल जाधव, भाजप नेत्या उमा खापरे, महिला आघाडी अध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक बाबू नायर, राजू दुर्गे, माउली थोरात, अण्णा गर्जे, राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.

खासदार अमर साबळे म्हणाले, सरकारने कंपन्यांकडून सीएसआर फंडातून होणारा खर्च आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संशोधन क्षेत्रावर खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्र वाढीस लागेल. तसेच कंपन्यांना आपल्या सेवा आणि उत्पादनांचा दर्जा सुधारण्याची संधी मिळेल. संशोधन क्षेत्रात गती येईल. नवीन संशोधकांना प्रोत्साहन मिळेल. तसेच देशी कंपन्यांचा कराचा दर कमी केला आहे. कर आकार जास्त असल्याने निर्यातीवर बंधने येत होती. कराचा दर कमी केल्याने ही बंधने येणार नाहीत. निर्यात क्षेत्र वाढल्यास विदेशी चलन येईल. याचा देशाच्या आर्थिक विकासात फायदा होईल.

भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. मागील एक महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील दहा बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. उद्योगांसाठी कर्ज भांडवल उपलब्ध होईल. गृहकर्ज, वाहन कर्ज, लहान कर्ज यावरील ईएमआय दर कमी होतील. आयकर विभागात कर प्रणालीसाठी सुसूत्रता आणली जात आहे. जीएसटीच्या दरात देखील सुधारणा करण्यात आली आहे. याचे अनेक फायदे नागरिकांना होणार आहेत, असेही खासदार साबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.