Pimpri: प्रवासी वाहतूक व माल वाहतूकदारांना सरकारने मदतीचा हात द्यावा- सचिन साठे

The government should help to passenger transporters and freight transporters says congress leader Sachin Sathe in pimpri

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर केंद्र सरकारने 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर केले. तेव्हापासून देशातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा परिणाम सर्व क्षेत्रातील उद्योजक, वाहतूक व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला.

विशेषत: खासगी प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा जास्त आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात व्यवसाय जरी बंद असला तरी वाहन नोंदणीचे सर्व वार्षिक कर, विम्याचे हप्ते आणि कामगारांचे पगार व्यावसायिकांना देणे भाग पडणार आहे.

या व्यावसायिकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील सर्व व्यावसायिक वाहनांचा वार्षिक कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी अचानक देशभर लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे कोट्यवधी व्यावसायिक वाहने आहे. त्या परिस्थितीत रस्त्यांवर अडकून पडली.

यातील कित्येक वाहनचालक भीतीपोटी व उपासमारीच्या भीतीने माल भरलेली वाहने रस्त्यावरच सोडून निघून गेली आहेत. शेकडो वाहनातील मुद्देमालाची चोरी झाली आहे.

त्याची नुकसान भरपाई या माल वाहतुक व्यावसायिकांना भरावी लागणार आहे. लॉकडाऊन काळाता व्यवसाय पूर्ण बंद आहे, परंतू सर्व व्यावसायिक वाहनांना जेव्हा वार्षिक नूतनीकरण करण्यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागेल तेव्हा या काळातील देखील सर्व प्रकारचे कर भरावे लागतील.

वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमूळे प्रवासी व माल वाहतूक करणारे व्यावसायिक अगोदरच अडचणीत आहेत तर लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

तसेच शहरी भागात अंतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, ओला, ऊबेरसारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस, कामगारांची प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या मालकांना राज्य सरकारने मदतीचा हात देणे आवश्यक आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये लाखो नागरिक रिक्षा व ओला, ऊबेरचा व्यवसाय करतात. त्यांचे उत्पन्नाचे साधनच लॉकडाऊनमुळे बंद होते.

हातावर पोट असणा-या या लाखो कुटुंबांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉकडाऊन काळातील राज्य सरकारचे सर्व कर माफ करावेत आणि राज्यातील या लाखो प्रवासी व माल वाहतूक करणा-या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.