Pimpri : पालिका शाळांमध्ये गोवर लसीकरण मोहीम राबविणार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांसाठी नोव्हेंबर महिन्यात महापालिका व खासगी शाळांमध्ये गोवर लसीकरण (मिझल्स रुबेला-एमआर) मोहीम राबवणार आहे.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत खासगी शाळांच्या प्राचार्य व संस्था चालकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. शैलजा भावसार, डॉ. विणादेवी गंभीर, डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. तृप्ती सांगळे आदी उपस्थित होते.

डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्यामध्ये मिझल्स लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे. त्यामुळे राज्यात मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेसाठी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील जास्तीत-जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यंत शाळांमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.