Chikhali News : अतिवृष्टीतील मृताच्या वारसाला मिळाली चार लाखांची मदत

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या पत्नीला अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या वतीने चार लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. तहसिलदार गीता गायकवाड यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून त्यांच्या पत्नीला चार लाखाची शासकीय मदत मिळवून दिली. भोसरीच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्या हस्ते त्यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

जनार्दन मारुती डिंबर (वय 47) हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रस्त्याने चिखली येथील आपल्या घराकडे येत होते. त्याचवेळी खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ते  दुचाकीसह वाहून गेले. खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

जनार्दन यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी चिखली येथे मासेविक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून दोन मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा गाडा त्या हाकतात. त्यात घरातील कर्ता पुरुष दगावल्याने त्यांच्यासमोर दुःखाचा डोंगर कोसळला.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी तात्काळ डिंबर यांच्या मृत्यूचा पंचनामा व पोलीस अहवाल मागविला. डिंबर हे अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या हद्दीतील चिखली गावचे रहिवाशी असल्याने त्यांच्या वारसाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली.

त्यानंतर शासनाकडून डिंबर यांच्या वारसांना चार लाखांची मदत मंजूर झाली. या मदतीचा धनादेश भोसरीच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्या हस्ते डिंबर यांच्या पत्नी संगीता यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. यावेळी चिखलीचे तलाठी अजय चडचणकर माजी नगरसेविका अलका यादव कोतवाल सुधीर रोकडे, मदतनीस महेश रोकडे, अशोक कोकणे उपस्थित होते.

शासनाकडून मिळालेली चार लाखाची मदत पाहून संगीता डिंबर  यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तसेच ही मदत मिळवून देण्यासाठी तत्परता दाखविल्याबद्दल संगीता यांनी तहसिदार गायकवाड यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, तहसिलदार गीता गायकवाड यांनी कोरोना काळात निराधार व्यक्ती, गोरगरीब आणि बेघरांना केली मदत, तसेच निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून मिळवून दिलेली नुकसान भरपाई आणि नुकत्याच आलेल्या अतिवृष्टीत मृत्यू झालेल्या जनार्दन डिंबर यांच्या वारसांना त्यांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून तत्परतेने स्वतः लक्ष घालून त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. यामुळे तहसीलदार गायकवाड यांच्यातील संवेदनशील महिला अधिकारी सर्वांना पाहायला मिळाला. त्यामुळे त्यांचे समाजाच्या सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.