Pimpri : राज्य सरकारच्या ‘त्या’ आदेशास उच्च न्यायालयाची स्थगिती; इरफान सय्यद यांची माहिती 

महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पाठपुराव्याला यश; माथाडी कामगारांच्या पगारातून हप्ते कापण्यास मनाई आदेशास स्थागिती

एमपीसी न्यूज – माथाडी कामगारांनी सहकारी संस्था, पतपेढी किंवा सहकारी, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम माथाडी कामगारांच्या वेतनातून कापून घेण्यास माथाडी मंडळांना मनाई करणा-या राज्य सरकारच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी दिली. तसेच या निर्णयामुळे माथाडी कामगारांना काहिसा दिलासा मिळाला असल्याचेही सय्यद यांनी सांगितले. 

माथाडी कामगारांनी सहकारी संस्था, पतपेढी किंवा सहकारी, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्याची रक्कम माथाडी कामगारांच्या वेतनातून माथाडी मंडळातर्फे घेण्यात येऊ नये असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याला माथाडी कामगार संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्यात आग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्र मजदूर संघटनेशी सलग्न असणाऱ्या रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था तसेच अन्य काही संस्थांनी सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते.

या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत सरकारच्या आदेशाला न्यायमूर्ती एम. एस. कार्णिक आणि न्यायमूर्ती आर.आय.छागला यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इरफान सय्यद म्हणाले, माथाडी कामगारांच्या कामाचे स्वरुप, निश्चित वेतन नसणे यामुळे या कामगारांना पतसंस्था, बँका कर्ज देण्यास तयार नसतात. त्यामुळे कामगारांचे नेतृत्व करणा-या संघटनांनीच पतसंस्था स्थापन करुन या अडचणीवर मार्ग काढला होता.

एखाद्या कामगाराने कर्ज घेतल्यावर त्याच्या संमतीपत्राच्या आधारे माथाडी मंडळे त्यांच्याकडे जमा होणा-या संबंधित कामगाराच्या मजूरीतून हप्ता कापून घेऊन तो पतपेढीकडे जमा करतात. परंतु, या प्रक्रियेलाच राज्य सरकारने मनाई केली होती. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कामगारांनी सध्या तरी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असेही सय्यद म्हणाले.

यावेळी कामगारांनी पेढ़े व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था  चेअरमन न्यानोबा मुजुमले, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था चेअरमन पांडुरंग कदम संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर सचिव सर्जेराव कचरे, अप्पा कौदरी,राजू तापकिर, आणि कामगार उपस्थित होते. रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यासह विविध संघटनांची न्यायालयात अॅड विश्वनाथ पाटील, अॅड आय केवल यांनी बाजू मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.