Pimpri : पिंपरीत सर्वाधिक 19 तर भोसरीत 6 बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत 6 बूथ संवेदनशील आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या सात दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. शहरात येणा-या वाहनांची नाकाबंदी केली जात आहे. तसेच यापूर्वी झालेल्या निवडणुकांमधील घटनांची नोंद घेत शहरातील 31 मतदान केंद्रांवरील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

हा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. संवेदनशील बूथ म्हणजे ज्या बूथवर यापूर्वी अनुचित घटना घडल्याची नोंद आहे. संख्याबळानुसार सांप्रदायिक तणावाची शक्यता आहे. राजकीय वैमनस्य असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. इतर केंद्रांपेक्षा अधिक मतदान झाले आहे किंवा ज्या बूथवर एकाच उमेदवाराला 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे, अशा बूथना संवेदनशील बूथ म्हटले जाते.

या निवडणुकीत निवडणूक आयोगामार्फत मतदान ओळखपत्र नसणारे मतदार ज्या भागात जास्त आहेत. त्या भागातील बुथही संवेदनशील ठेवण्यात येणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघात अशी 19 मतदान केंद्र आहेत. यामध्ये 80 टक्क्यांपेक्षा कमी मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसणारी 16 केंद्र असून 70  टक्क्यापेक्षा कमी मतदान ओळखपत्र नसणारी तीन मतदान केंद्र आहेत. अशा मतदान केंद्रावर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

दरम्यान, मावळ विधानसभेचा देहूरोड ते तळेगाव पर्यंतचा भाग पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाशी जोडला गेला आहे. या भागातील तीन बूथ पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.