Liquor Ban: मद्यमुक्त चंद्रपुरात मद्याची सर्वाधिक विक्री !

The highest sales of liquor in alcohol-free Chandrapur! काही महिन्यांपूर्वी पर्यंत आपल्या राज्याच्या काही भागात तरी दारू बंदी चांगली चालू असल्याच्या बातम्या समाधान देऊन जात होते.

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे, तळेगाव दाभाडे)- सध्या ऐकावं ते विशेषच असत. अशीच एक बातमी वाचायला मिळाली. दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दारूची सर्वाधिक विक्री झाली आहे. असं का व्हावं ? की जिथे खूप दिवसांपासून दारूबंदी आधीपासूनच आहे, तिथेच या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक दारु विक्री झाली. लॉकडाऊनमध्ये असं काय घडलं ? की जिथे दारूबंदी ही सवयीची असताना लोकांना दारू घ्यावीशी वाटत आहे. हा वेगळा मुद्दा होऊ शकतो.

पण जरा या लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकडे जर पाहिले, तर खूप गोष्टी अचंबित करण्यासारख्या आहेत. जेव्हा सगळीकडे वाईन शॉप्स पहिल्यांदा खूप दीर्घ कालावधीनंतर उघडली गेली, तेव्हा, सगळीकडेच मोठमोठ्या रांगा दिसायला लागल्या. हे कशाचे द्योतक आहे, या पुढारलेल्या (निदान पुस्तकामध्ये तरी वाचलेलं आहे) महाराष्ट्रात लोक का एवढे कासावीस होतात ? दारूशिवाय, बरं ! एकीकडे मुक्तांगणसारख्या अनेक संस्था व्यसन मुक्तीसाठी जीवाचं रान करतात. खेडोपाड्यात जाऊन समाज प्रबोधन करायचा प्रयत्न करतात.

पण हे सगळं बघितलं की ते प्रयत्न तोकडे वाटतात. कारण आपण साथ देत नाही आहोत. आपल्याला त्याच गांभीर्य कळत नाहीये. फार पूर्वीपासून आमच्या चित्रपटांमध्ये दारूला आम्ही खूप मह्त्व दिले आहे.

खूप कमी पातळ्यांवर त्याचे दुष्परिणाम आम्ही दाखवले आहे. ती दाखवतानाही दारू पिणाऱ्या माणसाविषयी सहानभूतीच आम्ही जास्त निर्माण केली आहे. दारू मात्र जिथल्या तिथे होती. अधिक आकर्षित करत होती.

या लॉकडाऊनमध्ये समाज माध्यमांवर काही मजेशीर अफवा ही उठल्या की म्हणे दारू प्यायल्याने कोरोना (Covid 19) पळून जातो. नंतर त्यावर मेडिकल मधील. अग्रगण्य संस्थांनी, आणि तज्ज्ञांनी स्पष्टीकरण देत या सगळ्यांना खोटं ठरवलं , अन तरीही आम्ही दारू प्यायचा हट्ट धरतो. हे कुठे घेऊन जाणार आहे ? हाच विचार येतो.

काही महिन्यांपूर्वी पर्यंत आपल्या राज्याच्या काही भागात तरी दारू बंदी चांगली चालू असल्याच्या बातम्या समाधान देऊन जात होते. पण, आता तिथेही या अशा बातम्या वाचून नैराश्य आल्याशिवाय राहत नाही.

दारूचे समर्थन करणारे लोक असं मानतात की दारू प्यायल्याने आलेलं नैराश्य पळून जाते. आणि या लॉकडाऊनमध्ये तर लोकांना मोठ्या प्रमाणावर नैराश्य आलेलं आहे. अन म्हणून ते दारूचा आधार घेत आहेत. मानसशास्त्राचा ते दाखला ही देतात, की जेव्हा मनुष्याला नैराश्य येते तेव्हा तो आधार शोधू लागतो वगैरे वगैरे… कोण म्हणतं की दारू प्यायल्याने नैराश्य जातं म्हणून.

अनेक जागतिक फोरम्स वरच्या चर्चांमध्ये मोठमोठ्या तज्ज्ञांनी हे व्यक्त केलंय की असं काहीही होत नाही. उलट, दारूच्या नशेत सतत दुःख कुरवाळण्याने नैराश्य अधिक वाढू शकते आणि त्यानंतर आत्महत्येचे विचार ही आपल्या मेंदूत प्रवेश करू शकतात. हे एका समाजासाठी घातक आहे. व्यसनी समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही, तो कायम नैराश्याला कवटाळून बसतो.

कोरोनाचे हे संकट कधी संपणार आणि जीवन पूर्ववत कधी सुरु होणार. हे कुणीच खात्रीलायक सांगू शकत नाही. अशावेळी आपल्याला धीराची तर आवश्यकता आहेच. पण, आपल्याला मूळ आदर्श वादाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. दारू हे काही कुठल्या प्रश्नांवर तोडगा असू शकत नाही. (सॅनिटायझर मधील सोडून) तो एक फक्त मनाला फ़सवण्याचा (गंडवण्याचा) एक खेळ असू शकतो.

त्यामुळेच वाटते की सरकारवर अवलंबून न राहता आपण आपापल्या पातळीवर दारूबंदी केली पाहिजे. आधी आपण स्वतःपासून सुरवात करून दारू विक्रीला प्रतिसादच दिला नाही पाहिजे. तर आणि तरच दारूबंदी खऱ्या अर्थाने होईल.

ता.क- नैराश्य आलं असेल तर दारू वगैरे चा आधार न घेता लोकांशी, अनुभवी व्यक्तींशी बोलून, संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा यावरची कृती ही करूया ना !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.