Bhosari : ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षामध्ये विसरलेला 26 हजारांचा ऐवज प्रामाणिक रिक्षाचालकाने केला परत

एमपीसी न्यूज – प्रवासादरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा 26 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. प्रामाणिक रिक्षाचालकाने ती बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करत ज्येष्ठ नागरिकाला त्यांची बॅग परत केली.

बाबू उस्मान शेख (वय 40, रा. खडकी बाजार) असे प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. निवृत्त वनसंरक्षक सी. एम. धारणकर (रा. निगडी, प्राधिकरण) यांची बॅग रिक्षामध्ये विसरली होती.

धारणकर बुधवारी (दि. 25) त्यांच्या कामानिमित्त नाशिक येथे गेले. नाशिकवरून ते रात्री बाराच्या सुमारास परत आले. धारणकर कासारवाडी येथील नाशिक फाट्यावर बसमधून उतरले. त्यानंतर त्यांनी नाशिक फाटा चौकातून निगडीला जाण्यासाठी बाबू यांची रिक्षा घेतली. कासारवाडी ते निगडी या प्रवासादरम्यान धारणकर यांची एक हॅन्डबॅग रिक्षात विसरली. त्यामध्ये त्यांचे दहा हजार रुपये रोख, मोबाईल फोन आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण 25 हजार रुपयांचा ऐवज होता.

घरी गेल्यानंतर रिक्षात त्यांची एक हॅन्डबॅग विसरल्याने लक्षात आले. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात आणि मार्गावरील इतर ठिकाणी चौकशी सुरु केली. गुरुवारी (दि. 26) सायंकाळी बाबू यांनी त्यांच्या रिक्षात सापडलेली बॅग भोसरी पोलिसांना आणून दिली. ही बॅग धारणकर यांची असल्याची खात्री झाल्याने भोसरी पोलिसांनी धारणकर यांना माहिती दिली. भोसरी पोलिसांनी प्रामाणिक रिक्षा चालकाचा सत्कार करून धारणकर यांना त्यांची बॅग परत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.