Chakan : पाणी भरण्याच्या कारणावरून घरमालकाकडून भाडेकरूला मारहाण

एमपीसी न्यूज – सार्वजनिक नळावर पाणी भरताना व्यवस्थित पाणी भर अन्यथा रूम खाली कर, असे म्हणत घरमालकाने भाडेकरू दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता राणूबाई मळा चाकण येथे घडली.

सविता कल्लप्पा कसेकर (वय 32, रा. रामनगर, राणूबाई मळा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमीर गनूभाई शेख (रा. राणूबाई, मळा, चाकण) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता कसेकर यांचे कुटुंब शेख यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाड्याने राहतात. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सविता पाणी भरत होत्या. त्यावरती शेख यांनी त्यांना नळावर पाणी भरताना व्यवस्थित पाणी भरायचे अन्यथा रूम खाली करायची, अशी धमकी दिली. यावर प्रतिक्रिया देत सविता म्हणाल्या, इतर लोक जसे पाणी भरतात तसेच मी भरते. हा प्रतिकार केल्याने शेख याने सविता यांना मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सविता यांचे पती कलप्पा बाहेर आले. त्यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता शेख याने त्यांना देखील दगडाने मारहाण केली. या भांडणात सविता आणि त्यांचे पती दोघेही जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.