BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी या मागणीसाठी मानवी साखळी

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी या मागणीसाठी ‘पीसीसीएफ’सह विविध संघटनांतर्फे आज (रविवारी) निगडी येथे मानवी साखळी करून शांततेत निदर्शने करण्यात आली. 

निगडीतील टिळक चौकात आज सायंकाळी चार वाजता मानवी साखळी करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी विविध सामाजिक संघटनांनी शांततेत निदर्शन केले. या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे या मागणीकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.पुणे महामेट्रोचे काम पिंपरीपर्यंत सुरु आहे. तथापि, पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावावी अशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची आग्रही मागणी आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने फेब्रुवारी 2019 मध्येच मान्यता दिली आहे.

अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु, 11 महिन्याचा कालावधी झाला. तरी, देखील केंद्र सरकारने या अहवालाला  मंजुरी दिली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची भावना आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे. अकरा प्रभाग असलेला निगडी परिसर दाट लोकवस्तीचा भाग आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोला केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी. या प्रमुख मागणीसाठी मानवी साखळी करण्यात आली होती.

साधारण पाच लाख लोकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. याच मागणीसाठी पूर्वी २६ जानेवारी  २०२० रोजी सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. तसेच शहरातील खासदार व आमदारांना निवेदन देऊन वेळोवळी पाठपुरावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, या मानवी साखळीमध्ये शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटनांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड सीटिझन फोरम (पीसीसीएफ) समवेत पोलीस नागरिक मित्र, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ,तनपुरे फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, ग्राहक पंचायत, भावसार व्हिजन, स्टेट बँक निवृत्त संघटना, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघ, आंघोळीची गोळी संस्था,संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ, आरोग्य मित्र फाऊंडेशन, एन जी ओ दिक्षा, थेरगाव सोशल फाऊंडेशन, हिंजेवाडी आय टी इंजिनिअर्स, अभंग शिक्षण, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, निसर्ग राजा मित्र जिवांचे तसेच सावरकर मित्र मंडळ सहभागी झाले होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like