Ind vs NZ 2nd Test : भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धचा सर्वात मोठा विजय मिळवून सामना आणि मालिका जिंकली

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मुंबई येथील वानखेडेवर झालेल्या पाच वर्षांनंतरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विश्व विजेत्या न्यूझीलंड संघावर आज चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांच्या खेळातच न्यूझीलंड संघाचा डाव गुंडाळून 372 धावांनी त्यांच्या विरुद्धचा आजतागायचा सर्वात मोठा विजय मिळवून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

काल सामना थांबला तेंव्हाच भारतीय संघाचा विजय निश्चित झाला होता,फक्त तो किती वेळात मिळणार या एकमेव उत्सुकतेने क्रिकेट रसिक या सामन्याकडे बघत होते, सामना चालू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच जयंत यादवने चार तर अश्विनने एक गडी बाद करत उरलेल्या पाच गड्यांचा  खेळ खल्लास करताच वानखेडेवर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

कालची नाबाद जोडी रचीन आणि निकोलस किती वेळ तग धरणार यावरच विजयाची औपचारिकता बाकी होती,पण आज जयंत यादवने सुंदर गोलंदाजी करताना चार बळी बाद केले,उरलेला शेवटच्या गड्याला म्हणजेच निकोलस ला बाद करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला तर सामन्यात 14 गडी बाद करणारा  एजाज नाबाद राहिला.

दोन्ही डावात भारताकडून सर्वोच्च धावा करणारा ,पहिल्या डावात दीडशतक आणि दुसऱ्या डावात 62 धावा करणारा मयंक आगरवाल सामन्याचा तर रवीचंद्रन अश्विन मालिकेचा मानकरी ठरला.भारतीय संघाचा हा मायदेशी सलग चौदावा मालिका विजय ठरला. तर भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या विराटच्या नेतृत्वात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे.

श्रेयस अय्यर,मयंक आगरवाल, वृद्धीमान साहा, आर अश्विन, अक्षर हे भारतीय संघाकडून या मालिकेत चांगली कामगिरी करून या यशाचे मानकरी ठरले, तर कोहली,पुजारा, रहाणे,गील यांना मात्र आपल्या कीर्तीला साजेशी कामगिरी करण्यात म्हणावे तितके यश मिळाले नाही.

रवी शास्त्रीची कारकीर्द संपल्यानंतर महान फलंदाज राहुल द्रविडने कोचची धुरा हाती घेतल्यानंतर मायदेशी 20/20 व कसोटी मालिका जिंकून सुरुवात अतिशय चांगली केली आहे,ती अशीच यापुढेही चालू राहावी याहून वेगळी अपेक्षा कुठल्याही क्रिकेटरसिकांची नक्कीच नसेल,नाही ?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.