Pune : आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे भारतातील घुबडांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत – डॉ. जेम्स डंकन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घुबड परिषदेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – भारतात घुबडांबाबत असलेली अंधश्रद्धा, कीटकनाशकांचा अमाप वापर आणि वसतिस्थाने नष्ट होण्याचा धोका या गोष्टींमुळे या ठिकाणी घुबडांसंबंधी आंतरराष्ट्रीय परिषद होणे महत्वाचे आहे. त्याद्वारे भारतात असलेली घुबडांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे मत ‘जागतिक घुबड परिषदे’चे समन्वयक डॉ. जेम्स डंकन यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर,वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. नितीन काकोडकर, इस्रायलमधील प्रख्यात पक्षितज्ञ डॉ. रुवेन योसेफ, प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ. कल्पना पै, ‘इला फाउंडेशन’चे संचालक डॉ. सतीश पांडे हेही या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात घुबडांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. करमळकर यांच्या उपस्तित झाले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात या वेळी डॉ. काकोडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये घुबड या पक्ष्याला महत्व प्राप्त व्हायला हवे. त्यादृष्टीने वन विभागाकडून दुर्लक्षित घुबडांचा अभ्यास केला जाईल. असे कार्यक्रम विद्यापीठात होण्याला विशेष महत्व आहे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीत माणसाला निसर्गाचा मालक नव्हे, तर हा त्याचा एक भाग मानले जाते. त्यामुळे निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. आताच्या परिषदेत विद्यापीठ, सेवाभावी संस्था, वन विभाग, अभ्यासक असे सर्व जण सहभागी झाले आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यातून घुबडांचे आणि एकणच पर्यावरणाचे संवर्धन व्हायला मदत होईल.

पक्षितज्ज्ञ रूवेन योसेफ यांनी, भारतातील पर्यावरणाच्या अभ्यासात आपला सहभाग असल्याचे सांगून त्यात आणखी वाढ केली जाईल, असे सांगितले.

परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक अभ्यासकांनी त्यांचे संशोधन सादर केले. भारत आणि अन्य देशातील संस्कृतीमधील घुबड विषयक संकल्पना या सत्रात भारतीय संस्कृतीतील घुबड या विषयावर डॉ. सुरुची पांडे यांनी विचार मांडले. तसेच, ऑस्ट्रियामधील संशोधक इनग्रीड कोल, स्वीत्झरलँड मधील संशोधक अॅलेक्स राऊलींन यांनी विचार व्यक्त केले. नंतर घुबड विषयक शास्त्रीय माहितीचे विविध पैलू व्यक्त करणारी सत्रे झाली. ही परिषद २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशी चार दिवसांची आहे. त्यात १६ देशांमधील घुबड विषयक अभ्यासक सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.