Chakan : खेड न्यायालयाने माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

एमपीसी न्यूज –  खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने चाकण हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज (शुक्रवारी) पुन्हा सुनावणी करत जामीन अर्ज फेटाळला. 

चाकण येथे जुलै 2018 मध्ये मराठा क्रांती मोर्चाने बंद पाळला. या बंद दरम्यान मोर्चाला हिंसक वळण लागले. यामध्ये पोलिसांनी पाच हजार जणांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अटकपूर्व जमीन मिळावा यासाठी मोहिते यांनी न्यायालयात धाव घेतली.

चाकण हिंसाचाराच्या घटनेपूर्वी काही दिवस हा कट रचण्यासाठी एक बैठक झाली होती. या बैठकीला दिलीप मोहिते हजर असल्याचे साक्षीदरांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. मात्र, या साक्षीदारांची नावे आता उघड करता येणार नाहीत. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यानुसार या घटनेची पूर्वकल्पना होती, हे सिद्ध होत आहे. म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये, असा युक्तीवाद सरकारी वकील अरुण ढमाले यांनी केला.

‘पोलिसांनी कटकारस्थानाचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी केले. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा छळ करण्याचा उद्देश आहे. म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी दिलीप मोहिते यांचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.