Pimple Saudagar : बांधकाममंत्र्यांनी कोल्हापूर-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा दिवसा पाहणी दौरा करावा – नाना काटे

एमपीसी  न्यूज – मुंबई – बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत. अशी टिका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बांधकाममंत्री यांच्यावरती केली आहे.

बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना महामार्गावरील ‘खड्ड्यासोबत सेल्फी’ काढून पाठविला आहे. जसे रात्रीचा दौरा करुन कोकणातील लोकांना वेड्यात काढलं तसे पुणेकरांना काढता येणार नाही. मुंबईला जाताना पुणे मार्गाने जावे लागते त्यामुळे ‘येड घेऊन पेडगावला जाण्याचा’ तुमचा स्वभाव आम्हाला चालणार नाही. तारीख पे तारीख देवून लोकांना किती दिवस वेड्यात काढणार एक दिवस जनताच तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा नाना काटे यांनी दिला.

शुक्रवारी मुंबई– गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी करण्यासाठी बांधकाम चंद्रकांत पाटील गेले होते. परंतु रात्रीच्या वेळी बांधकाम मंत्री आल्याने त्यांच्या निदर्शनास रस्त्यावर खड्डे दिसलेच नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनी रात्रीच्या वेळी रस्त्याची पाहणी केल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण कळलं नाही. या मार्गावर रात्री उशिराने दाखल झाल्याने बांधकाममंत्री यांची सफरही आलिशान वाहनातुनच घडली. बांधकाममंत्र्यांचा महामार्ग पाहणीचा दौऱ्यामुळे त्याठिकाणच्या प्रवासी व वाहन चालक यांना दिलासा मिळेल अशी आशा होती .

परंतु त्यांनी रात्रीची रस्त्याची पाहणी हि एकूणच बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाला पाठिंबा देण्यासाठी होती अशी चर्चा कोकणातील नागरिकांत सुरु झाली आहे. सर्व महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे तशीच अवस्था मुंबई-बेंगलोर महामार्गवरती आहे. मुंबई – गोवा महामार्गवरती रात्री दौरा करुन काहीच खड्डे दिसले नाहीत. त्यांची पुनरावृत्ती पुणेकरांच्या बाबतीत होवू नये म्हणून कोल्हापूर-मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी दौरा  दिवसा करण्याची मागणी नाना काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.