Pune : शेवटच्या बैठकीत सदस्यांकडून स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना शुभेच्छा; सभागृह नेतेपदाचा धीरज घाटे बुधवारी पदभार स्वीकारणार

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष म्हणून सुनील कांबळे यांची सोमवारी शेवटची सभा पार पडली. या बैठकीत सदस्यांनी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची आमदारपदी निवड झाल्याने ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. शुक्रवारी या पदासाठी निवडणूक होणार आहे.

सभागृह नेते पदावर श्रीनाथ भिमाले यांनाही पावणेतीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्या जागी नगरसेवक धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर घाटे हे पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांचीही आमदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनाही ‘पीएमपीएमएल’ संचालक पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.

त्यामुळे या पदावर काम करण्यासाठी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपचा दनकावून पराभव झाला होता. तर, 3 मतदारसंघात विजय मिळविता मिळविता नाकीनऊ आले होते. त्यामुळेच महापालिकेतील पदाधिकारी तातडीने बदलण्यात आल्याची जोरदार कुजबुज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.