BNR-HDR-TOP-Mobile

Alibag : 1947 च्या रामदास बोट दुर्घटनेतून बचावलेला अखेरचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज – विश्वनाथ मुकादम, या अवघ्या 10 वर्षे वयाच्या मुलासमोर समुद्राच्या लाटांनी माघार घेतली. अन् तब्बल 640 जणांना जलसमाधी देणा-या रामदास बोट दुर्घटनेतून विश्वनाथ आश्चर्यकारक रित्या बचावले. लाटांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 22 तास पोहोत त्यांनी किनारा गाठला. त्यांच्या या धाडसापुढे समुद्राच्या लाटांनी जणू नमतं घेतलं होतं. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी काळालाही माघारी धाडले. मात्र, आज वयाच्या 82 व्या वर्षी काळाने त्यांना आपल्या वश केले. त्या दुर्घटनेचे ते अखेरचे साक्षीदार होते.

रामदास बोट जलसमाधी दुर्घटना ही स्वातंत्र्यापूर्व काळातील. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 29 दिवस आधी गटारी अमावस्येला 17 जुलै 1947 रोजीची ही दुर्घटना. 1936 मध्ये मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला होता. मात्र, बोटीचा प्रवास हा जनसामान्यांकरता सोयीस्कर होता. त्यामुळे कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व छोटी बंदरे बारमाही वाहतुकीमुळे सतत गजबजलेली असत. रेवस, करंजा, उरण, चौल, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिघी, रोहा, म्हसळा तसेच खेड, मंडणगड, दाभोळ व चिपळूण येथील सर्व मंडळी मुंबईत गिरगाव, भायखळा, लालबाग व परळ या गिरणगावात आश्रयाला होती. परिणामी दर आठवडय़ाला त्यांचा बोटीने गावाला येण्या-जाण्याचा प्रवास असे, तोही रामदासच्या शनिवारच्या विशेष फेरीने!

कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोव्यापर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन (बी.एस.एन.) या कंपनीद्वारे रामदास, रोहिदास, जयंती व चंपावती या बोटी प्रवासी वाहतूक करीत असत. रामदास बोट मुख्यत: मुंबई ते गोवा मार्गावर नियमित फे-या करीत असे. तर शनिवारी फक्त रेवसची छोटी फेरी करीत असे. अशातच भारतीय स्वातंत्र्याच्या एक महिना अगोदरची सकाळ मात्र कोकणवासीयांवर घाला घालणारी ठरली.

‘रामदास’ ही उच्च खानदानीतील 1979 फूट लांब, 29 फूट रुंद व 406 टन वजनाची. 1936 मधील स्कॉटलंड बनावटीची, 1942 मध्ये युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. पावसाळी दिवस असूनही स्वच्छ हवामान असल्याने बोट नेहमीप्रमाणे आपल्या रेवसच्या सफारीला मुंबईहून सकाळी 8.30 वा. निघाली. बोटीचे कप्तान सावंतवाडीचे मुरब्बी दर्यासारंग शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई त्यांच्या दिमतीला होते. त्यांनी आपल्या अन्य सहका-यांच्या मदतीने धक्क्याला अलविदा करीत रेवसच्या दिशेने कूच केली. वाफेवर चालणा-या या बोटीने सुमारे 9 सागरी मैल अंतर पार करून अर्धा तास झाला होता. बोट खुल्या समुद्रात मार्गक्रमण करताना काहीशी तिरकी चालत होती.

नेमके याच वेळी काळाने घाला घातला. अचानक हवामानात बदल झाल्याने ताशी ५० मैल वेगाने जाणारे चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामी जोरदार लाटा, वेगवान वारा व पाऊस यांनी रौद्र रूप धारण केले. बोटीचे कापडी पडदे फाटून त्यातून पावसाचे पाणी आत येऊ लागले. लाटांची उंची व जोर वाढून मुसळधार पावसामुळे पुढचे काहीच दिसनासे झाले. कॅप्टनसमोर कोणताच पर्याय उरला नव्हता. अशातच बोट करंजा खडकाजवळील ‘बॉय’जवळ आलेली. त्यामुळे त्याने रेवस बंदर गाठण्याचा निर्णय घेतला. परंतु करंजा बॉयजवळ समुद्रात कुठून तरी वाहत आलेली तेलाची काही रिकामी पिंपे तरंगताना दिसल्याने कॅप्टनने पिंपांना टाळण्यासाठी जरासा वळसा घेताना बोट काहीशी जास्त कलली. दुर्दैवाने त्याच वेळेस एक प्रलयकारी लाट बोटीवर आदळली.. आणि बोट कलंडली. बोट कलंडल्याने सर्व प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत बोटीच्या एका टोकास व कुशीस जमू लागल्याने बोट आणखी कलंडली. प्रवाशांची आरडा-ओरड व आर्त किंकाळय़ांनी बोटीचा परिसर गलबलून गेला. त्यातच पिंपे चुकविण्याच्या प्रयत्नात बोट थेट काशाच्या खडकावर जाऊन आदळली.

दरम्यान, दुसरी लाट येण्याच्या काळात बोटीचा तोल न सावरल्याने, काय होते हे कळायच्या आतच बोटीत पाणी शिरले व बोट बुडून समुद्रतळाच्या दिशेने जाऊ लागली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बोटीचे कप्तान शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई खिडकीतून बाहेर पडल्याने वाचले. शेख पोहत रेवसला गेले व तेथून अलिबाग गाठून त्यांनी मुंबई कार्यालयात तार केली. त्याच दरम्यान पांडू कोशा कोळी हा प्रवासी पोहत मुंबईला पोहोचला. तर त्यातील काही जणांना स्थानिक मच्छिमारांनी वाचवले. अनेकांचे मृतदेह मिळाले नाही. तर ज्यांचे मिळाले त्यापैकी अनेकांची ओळखच पटली नाही. माशांनी अर्धवट चावलेले होते.

अशा भीषण परिस्थितीत विश्वनाथ मुकादम यांनी स्वतः पोहोत येऊन स्वतःचा जीव तर वाचवलाच पण कस्टम अधिकारी बेशुद्धावस्थेत लाईफबॉयवर तरंगताना आढळल्याने त्यांनाही किना-यावर घेऊन आले. मुकादम यांच्या या धाडसाचे त्यावेळच्या ब्रिटिश अधिका-यांनी भरभरून कौतुक केले. आणि त्यांचा गौरवही केला.

बारक्याशेठ मुकादम यांच्या निधनामुळे रामदास बोट दुर्घटनेचा ईतिहास सांगू शकणाऱ्या अलिबागमधील अखेरच्या साक्षीदाराच्या जीवनपर्वास आज पूर्णविराम मिळाला आहे. मुकादम यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना-जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अलिबाग कोळीवाडय़ातील मेटपाडा स्मशानभूमीत त्याच्यावर दूपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबाग शहरवासीच्या वतीने मुकादम यांना श्रद्धाजली व्यक्त केली. अंतयात्रेत अलिबाग व परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

HB_POST_END_FTR-A2