Pune News : वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या त्या बिबट्याला अखेर सोडावे लागले

एमपीसी न्यूज : पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट मादीला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता. पण या पिंजऱ्यात बिबट मादीऐवजी तिचा दोन वर्षाचा बछडा जेरबंद झाला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कळमजाई शिवारात हा प्रकार घडला. परंतु पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याला भेटण्यासाठी आतुर असलेल्या त्याच्या आईने पिंजऱ्या भोवतीच ठाण मांडल्याने शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अखेर त्या बछड्याला पुन्हा सोडून देण्यात आले. 

नारायणगाव शिवारात एका बिबट मादीने धुमाकूळ घातला होता. पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या बिबट मादीला पकडण्यासाठी वनविभागाकडून सापळा रचण्यात आला होता. रविवारी सकाळी या पिंजऱ्यात एक बिबट सापडला होता.

या पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्याचा बछडा त्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे बछड्याची आई पिंजऱ्याभोवती सैरभैर होऊन फिरत होती. ही घटना वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याच्या बछड्याला शिताफीने शेजारीच असलेल्या ऊसामध्ये सोडून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.