Pune News : कर्करोगाचे कुटुंबावर दीर्घकालीन परिणाम

एमपीसी न्यूज : कर्करोगाच्या आजाराचा रुग्ण तसेच संपूर्ण कुटुंबावर दीर्घकालीन परिणाम होतो. भारतातील सर्वात वेगाने वाढणार्‍या आजारांपैकी एक म्हणून आपण कर्करोगाकडे पाहिले पाहिजे. आपल्या जीवनावर, कुटूंबावर व समाजावर परिणाम करणा-या या आजाराविषयी अतिशय गंभीर पाऊले उचलणे गरजेचे आहे.

कर्करोगाविषयी जागरूकता येण्यासाठी व्यापक जनजागॄती मोहिमांची आवश्यकता आहे, असे मत कोलंबिया एशिया रुग्णालयाचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संकेत बनकर यांनी दिले आहे.

बहुतेक प्रकरणांमध्ये लोक कर्करोगाच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करतात. जागरूकता नसणे आणि सामाजिक दबाव ही महत्वाची कारणे आहेत. भारतातील कर्करोगाच्या जवळजवळ दोन तृतीयांश प्रकरणांचे निदान प्रगत अवस्थेत होते. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करण्याची संधीच मिळत नाही. परिणामी रुग्ण वाचण्याची शक्यता कमी असते. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग असे कर्करोगाचे तीन प्रकार असतात.

डॉ. संकेत बनकर म्हणाले की, “एनएफएचएसच्या ताज्या आकडेवारीनुसार पुण्यातील कर्करोगाच्या तपासणीत पुरुष आणि स्त्रिया दोन्ही मागे आहेत. तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोग आहे. सुमारे 11 टक्के पुरुषांना हा कर्करोग आहे. भारतातील सर्व शहरांमधील महिलांमधील स्तनाच्या  कर्करोगाची टक्केवारी सुमारे 32 टक्के आहे. तर गर्भाशयाच्या कर्करोगाने 2019 मध्ये देशभरात 60 हजारांहून अधिक महिला मृत्यूमुखी पडल्या आहेत.”

पुण्यात सर्वांचा स्क्रीनिंग दर 5 टक्क्यांहून कमी आहे. पुण्यातील गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी 3.8  टक्के, स्तनाच्या कर्करोगाची 2.3 टक्के व तोंडाच्या कर्करोगाची तपासणी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळॆच कर्करोगाचा आजाराचा प्रतिबंध करणे किंवा चांगले उपचार होण्यासाठी लवकरात लवकर निदान होणे अत्यंत महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.