Pimpri : विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन आज महासभा गाजणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर आज (शनिवारी) होणा-या महासभेत चर्चा होणार आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन विरोधकांसह सत्ताधा-यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्याची महासभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. तरीही, पावसाळ्यात शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत  आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. विरोधकांसह सत्ताधारी देखील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन वैतागले आहेत. वारंवार बैठका घेऊन देखील फलनिष्पती शून्य आहे. चार दिवसात, आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, असे सत्ताधा-यांनी इशारे देऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.

त्यामुळे उद्या होणा-या महासभेत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आंदोलनाचा पवित्र घेणार आहेत. तर, विरोधक देखील आंदोलन करणार आहेत. तसेच पाणीपुरवठ्यावरुन महासभेत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर आज (शनिवारी) होणा-या महासभेत चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन आमच्या पक्षाचेच नगरसेवक आंदोलन करण्याची शक्यता आहे’.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सनासुदीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे’. सत्ताधा-यांना साधा पाणीपुरवठा सुरुळीत करता येत नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आंदोलन करणार आहेत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.