Chinchwad : आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य सराईत आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य आरोपी अदयाप फरार होता. फरार असलेल्या मुख्य आरोपीला चिंचवड पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातून अटक केली.

रणजित बाबू चव्हाण (वय 23, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. यापूर्वी चिंचवड पोलिसांनी आकाश लांडगे खून प्रकरणात स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लांडगे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी रणजित घटना घडल्यापासून फरार होता. चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. रणजित आरसोली, ता. भूम, जि. उस्मानाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने आरसोली या गावात जाऊन सापळा रचून रणजितला ताब्यात घेतले. रणजित याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ या पोलीस ठाण्यातील फरार आरोपी होता. यावरून त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक आखाडे, शेलार, शिरसाठ, पोलीस शिपाई डोके, आंबटवार यांच्या पथकाने केली.

काय आहे रायबा उर्फ आकाश लांडगे प्रकरण ?

आकाश लांडगे आणि रणजित बाबू चव्हाण या तरुणाची एप्रिल-मे 2018 मध्ये भांडणे झाली. त्या रागातून रणजित याने त्याच्या स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, सोन्या वराडे आणि प्रफुल्ल ढोकणे या मित्रांच्या मदतीने आकाशचा चाफेकर चौकात मंगळवार (दि. 30) रोजी आकाशला अडवून कोयता आणि रॉडने पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि. 31 मे) पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला. रणजित चव्हाण याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मयत आकाश देखील गुन्हेगार होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 395,427 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याबाबतचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात पाठविले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.