Sangvi : दुसऱ्याचे घर आणि कार दाखवून लग्न जुळवल्याने विवाहितेची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – दुसऱ्याचे घर आणि कार स्वतःची असल्याचे खोटे सांगून लग्न जमवले. मात्र, लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. त्यानंतर विवाहितेने पोलिसात धाव घेत सासरच्या पाचजणांच्या विरोधात तक्रार दिली. हा प्रकार जुनी सांगवी येथे घडला.

पती अविनाश आनंद चौधरी, सासू आशा आनंद चौधरी, सासरा आनंद गणपती चौधरी, दीर अमोल आनंद चौधरी, जाऊ स्वप्नाली अमोल चौधरी (सर्व रा. मधुबन सोसा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अविनाश यांचे सन 2013 मध्ये लग्न झाले. लग्न जुळवताना आरोपींनी आपसात संगनमत करून दुसऱ्याचे घर आणि कार स्वतःच्या मालकीची असल्याचे विवाहितेच्या कुटुंबीयांना सांगितले. लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. तसेच, अविनाश याचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचेही काही दिवसांनी उघड झाले.

या कारणांमुळे तरुणी आणि अविनाश यांच्यात वाद होऊ लागले. सन 2016 मध्ये विवाहितेला एक मुलगी झाली. त्यावरून देखील आरोपींनी हाताने मारहाण करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.