Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5 तास ही बैठक चालली.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

‘एचसीएमटीआर’, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा – आसखेड, नदी सुधार – जायका प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, पथ विभागाकडील महत्वाचे रस्ते, प्रस्तावित बोगदे, बालभारती पौड फाटा रस्ता, मयूर डीपी रस्ता, शिवसृष्टी, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, स्मार्ट सिटीचे प्रकल्प, पुणे मेट्रो, ‘पीएमपीएमएल’ बस खरेदी व सेवा सुधारणा, स्व. अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, महापालिकेचे इतर दवाखाने व हॉस्पिटलमधील सेवा सुविधा, शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल, उद्यानांमधील सुधारणा, ‘सीएसआर’ निधीमधून करावयाची कामे, ‘बीओटी’ माध्यमातून करता येऊ शकणारे प्रकल्प, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेची गतिमानता वाढविणे, शिक्षण विभाग संबंधित कामे, अशा विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव व अतिरिक्त आयुक्त यांना सूचना केल्या.

2017 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मोहोळ यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यातील वैद्यकीय महाविद्यालय योजना, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल, असे अनेक कामे सुरू झाल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर, बालगंधर्व पुनर्विकास संदर्भात कलावंतांच्या सूचना लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतर्फे बीडीपीच्या 45 एकर जागेत शिवसृष्टी उभारणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. ही शिवसृष्टी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.