Pimpri: विठ्ठलवाडी ते देहूगाव रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे महापौर जाधव यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विठ्ठलवाडी ते देहूगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, असे आदेश  महापौर राहुल जाधव यांनी आज (मंगळवारी)स्थापत्य विभागाला दिले. तसेच पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावर डांबरीकरण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. 

महापालिका हद्दीत असलेल्या विठ्ठलवाडी ते देहूगाव या साडेसात मीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे अपघात होत असल्याची तक्रार देहूगावच्या सरपंच उषा चव्हाण यांनी महापौर जाधव यांच्याकडे केली होती. त्यांनी सोमवारी (दि.20) महापौरांची भेट घेऊन खड्डे बुजविण्याची विनंती केली.

त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी आज मंगळवारी या रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे पाहून महापौरांनी स्थापत्य विभागाच्या अधिका-यांना तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानुसार खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.  तसेच पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावर डांबरीकरण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

महापौर राहुल जाधव म्हणाले,  ‘विठ्ठलवाडी ते देहूगाव हा साडेसात मीटर रुंदीचा दीड किलो मीटर रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. या मार्गावर पालिकेचे बीआरटीएस प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. उर्वरित जागा पालिकेच्या ताब्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि शेतक-यांचा उर्वरित जागेवर ताबा असून शेतक-यांच्या मोबदल्याचा वाद सुरु आहे.  यावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी (दि.27)सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिकेचा नगररचना, स्थापत्य, बीआरटी विभाग, देहू ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयात दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असल्याचे’, त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.