Pimpri News: वैद्यकीय विभागाला कोविड सेंटरच्या खर्चाचा मेळ बसेन, महिना होऊनही हिशोब सादर करता येईन
एमपीसी न्यूज – कोरोना काळात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर, विलगिकरण कक्ष आणि जम्बो कोविड केअर सेंटर यांवर आतापर्यंत एकूण किती खर्च झाला आहे? याच्या हिशोबाचा मेळ एक महिना झाला. तरी, वैद्यकीय विभागाला बसत नाही. स्थायी समितीला माहिती देण्यास महिन्याभरापासून विभागाकडून वेळकाढूपणाची भुमिका घेतली जात आहे.
आता पुन्हा आठ दिवसांची मुदत मागितली आहे. दरम्यान, राजकीय पुढाऱ्यांना कोट्यवधींची वाढीव बिले अदा झाली आहेत. त्यामुळेच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे.
स्थायी समितीच्या एक महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत वैद्यकीय विभागाकडून कोविड केअर सेंटरवर झालेल्या खर्चाची माहिती मागविली होती. मात्र, वैद्यकीय विभागाने अद्यापही ही महिती दिलेली नाही. तसेच माहिती सादर करण्यासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे.
शहरात मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. लक्षणे नसलेले रुग्ण, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, गंभीर रुग्ण, हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेले नागरिक या सर्वांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच खासगी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. यामध्ये 23 कोरोना केअर सेंटर खासगी पद्धतीने सुरू करण्यात आले होते. तर, राज्य शासन, पीएमअरडीए, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी एकत्रितरित्या अण्णासाहेब मगर स्टेडियमवर सुमारे एक हजार बेडचे जम्बो कोरोना केअर सेंटर उभारले होते.
या सर्व सेंटरवर महापालिकेचा एकूण किती खर्च झाला, याची माहिती चार आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मागविण्यात आली होती. त्यावेळी पुढील आठवड्यात या बाबतची सविस्तर माहिती देण्यात येईल, असे वैद्यकीय विभागाने सांगितले. त्यानंतर स्थायी समितीच्या तीन बैठका झाल्या. मात्र, वैद्यकीय विभागाने कोणत्याही प्रकारची माहिती सादर केली नाही.
त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत पुन्हा वैद्यकीय विभागाला या खर्चाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी पुढील बैठकीत सर्व खर्चाची माहिती सादर करू, असे वैद्यकीय विभागाने सांगितले. दरम्यान, सर्व कोरोना केअर सेंटरचा एकत्रित हिशोब द्यायचा आहे. त्यामुळे उशीर होणारच, अशी वैद्यकीय विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.