Pimpri: ‘कुत्र्यांवरुन’ महासभेत गोंधळ, राष्ट्रवादी; भाजप नगरसेवकांमध्ये ‘तु-तु, मै-मै’

महासभा गुरुवारपर्यंत तहकूब 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी)महासभेत कुत्रे घेऊन येण्याचा प्रयत्न केला. तथापि, कुत्रे सभागृहात घेऊन जाण्यास सत्ताधा-यांसह प्रशासनाने विरोध दर्शविला. तसेच कुत्र्यांची पिल्ले लहान असल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्यावर ‘पेटा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावरुन महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महापौर राहुल जाधव यांनी पहिल्यांदा दहा मिनिटे अन्‌ दुस-यावेळी गुरुवार (दि.27) दुपारी दोन वाजेपर्यंत महासभा तहकूब केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सप्टेंबर महिन्याच्या महासभेचे आज आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिशवीत कुत्र्यांची पिल्ले आणली होती. तथापि, त्यांना कुत्रे घेऊन सभागृहात जाण्यास मनाई केली. तोपर्यंत महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी भाषणाला सुरुवात करत कुत्र्यांची पिल्ले लहान आहेत. त्यांना त्रास दिला जात असल्याचे सांगून साने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न संपुर्ण शहरात आहे. त्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे. परंतु, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा त्यांनी निषेध केला. तर, विरोधकांनी प्रशासनावर राग काढावा, असे विकास डोळस म्हणाले. राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा बाता मारल्या जातात. मात्र हे शहर कुत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अधिका-यांना फोन केला असता ते फोन उचलत नाही. तसेच आंदोलन जर केले नाही, तर प्रश्न कसे सुटणार आहेत. आंदोलनाचा निषेध करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरु आहे.

शहरात कुत्रे, डुक्करांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुक्करे शिरतात तरी देखील त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. डुक्करांना पकडण्याचे हप्ते घेतले जातात. अधिकारी हप्ते घेऊन पालिकेत येऊन बसतात, असे नीता पाडाळे म्हणाल्या. भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, शहर प्राणीसंग्राहलय झाले आहे. डुक्करे, कुत्री, भाकड जणावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने बोलण्यास उभे राहिले. महापौर, सभागृह नेत्यांच्या विनंतीनुसार आम्ही कुत्र्यांची पिल्ले सभागृहात आणली नाहीत. त्यांचे ऐकूण देखील गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया उमटणे चुकीचे आहे. तेवढ्यात खाली बसलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकामध्येच बोलत असताना साने म्हणाले, मी कुत्र्यांच्या पिल्लांची हेळसांड केली नाही. त्यांना खाऊ-पिऊ घातले आहे. तसेच मी 96 कुळी शेतकरी असून गाय, म्हैस, बैल, कुत्रे, मांजर ही जनावरे पाळण्याची आमची संस्कृती आहे. पोटच्या पोरापेक्षा त्यांचा आम्ही जास्त सांभाळ करतो. त्यानंतर नगरसेविका सीमा सावळे आणि साने यांच्यात ‘तु-तु, मै-मै’ सुरु झाली.

तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. त्याचदरम्यान महापौर राहुल जाधव यांनी श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली.  नगरसेवक नामदेव ढाके यांनी दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून सभा दहा मिनिटे तहकूब केली. सभा सुरु झाल्यानंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी 96 कोळी शेतकरी शब्द सभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची सूचना करत सभा 27 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले.

दरम्यान, सभा तहकूब झाल्यानंतर भाजपच्या काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन 96 कोळी शेतकरी शब्दाचा जाणीवपुर्वक उल्लेख केला असल्याचे सांगत त्याचा निषेध केला. तर, आपण शेतकरी असल्याने 96 कोळी शेतकरी शब्द वापरला असून सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक जातीचे राजकारण करत असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेत्याने केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.