Nigdi : पत्नीच्या उपचारासाठी कर्ज घेतलेले पैसे चोरट्यांनी बस प्रवासादरम्यान पळवले

एमपीसी न्यूज – पत्नीच्या उपचारासाठी एक लाख 5 हजारांचे कर्ज घेतले. ते पैसे घेऊन पीएमपी बसने जात असताना बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सर्व पैसे पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी साडेआठ ते नऊ वाजता निगडी बस थांबा ते एसकेएफ कंपनी चिंचवड या दरम्यान घडली.

बबन सुरमाजी पवार (वय 57, रा. निगडी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 3) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांची पत्नी आजारी असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीच्या औषधोपचारासाठी पवार यांनी एम ई एस खडकी येथून एक लाख 5 हजारांचे कर्ज घेतले. पैसे घेऊन ते पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. पत्नीला भेटून पुन्हा खडकीकडे जाण्यासाठी ते निगडी येथे आले. निगडी बस थांब्यावरून ते बसमध्ये बसून खडकीकडे जात असताना बसमध्ये त्यांच्या शेजारी अनोळखी तीन ते चारजण उभे राहिले. बस प्रवासादरम्यान पवार यांनी आकुर्डी येथे आल्यानंतर पैसे ठेवलेला खिसा तपासला असता खिशात पैसे नव्हते. त्यांच्या शेजारी उभा असलेल्या तीन ते चार जणांनी त्यांचे पैसे चोरल्याबाबत पवार यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.