Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवली

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज  – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दिलेली चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे (Pune)  आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हिरवा कंदील दिला. त्यामुळे गेल्या १७-१८ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.

Bhosri : नवीन भोसरी रुग्णालयात तब्बल सहा हजार कोविड रुग्ण झाले ठणठणीत

कोरेगाव भीमा ते चौफुला, केंदूर पाबळ रस्ता अनेक वर्षांपासून दुरावस्थेत होता. या रस्त्याच्या कामाकडे नेहमीच दुर्लक्ष होत होते. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी विशेष लक्ष घालून कोरेगाव भीमा ते वढू बु.कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पीएमआरडीएच्या निधीतून ६.५ कोटी मंजूर केले होते. त्यानंतर उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता.

त्यानुसार अजित पवार यांनी कोरेगाव भीमा ते वढू बु. आणि चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ तसेच पुणे (Pune) आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ अशा चार कामांसाठी एकूण ३९.२० कोटींचा कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कोरेगाव भीमा ते वढू बु. दरम्यानच्या कामाची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली, त्यामुळे हे काम प्रत्यक्ष सुरुही झाले. परंतु चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात सत्तांतर झाले आणि नव्या सरकारने कामांवर सरसकट स्थगिती दिली होती.

या तीनही महत्वाच्या रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या संदर्भात थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही लक्ष घालण्याची विनंती केली होती.

त्यानंतर तातडीने हालचाल होऊन चौफुला ते केंदूर (१० कोटी) केंदूर ते पाबळ (९ कोटी) तसेच पुणे आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ (८.२० कोटी) या रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठविण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

खरं तर या रस्त्यांची कामे अनेक वर्षं दुर्लक्षित राहिली होती. त्यामुळे या मार्गावरील विविध गावातील ग्रामस्थांनी खासदार डॉ. कोल्हे यांना साकडे घातले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे जाणारा असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी गांभिर्याने लक्ष घालून या रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याचा आग्रह धरला होता.

त्यांचे प्रयत्न यशस्वीही झाले होते, परंतु सत्तांतरानंतर स्थगिती आल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु अखेरीस ही स्थगिती उठविल्याने आता रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, अनेक वर्षे या रस्त्यांची कामे का रखडली होती. परंतु माझ्या शंभुराजांच्या समाधीस्थळाला जोडणारा हा रस्ता व्हावा यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. आता स्थगिती उठून ही कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला असून वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देणाऱ्या शंभुभक्तांची सोय होणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. तसेच ही स्थगिती उठविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.