Chinchwad News : मुलीच्या उपचारासाठी आईने केला आपल्या यकृताचा काही भाग दान

एमपीसी न्यूज – बारा वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी आईने आपल्या यकृताचा काही भाग दान केला. चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील हि पहिली रोबो असिस्टेड लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी पार पडली. लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शरण नरूटे यांनी या 12 वर्षांच्या मुलीवर ही सर्जरी केली. 

बारा वर्षांच्या या चिमुकलीला primary biliary cirrhosis हा आजार होता आणि तो लिव्हरच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराच्या दिशेने चालला होता. या आजारामुळे तिच्या पोटात द्रव पदार्थ साठत होते. त्यामुळे ओटीपोटात दुखायचं व तिचं कुपोषण होत होतं. मुलीच्या आईने आपल्या यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. जवळपास साडे सहा तास हि शस्त्रक्रिया चालली. सात दिवसांनंतर मुलीला घरी सोडण्यात आले.

लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शरण नरूटे म्हणाले, ‘अवयवदानाची प्रक्रिया व्हायला वेळ लागतो. या मुलीच्या बाबतीत तिच्या आईने आपल्या लिव्हरचा म्हणजे यकृताचा काही भाग आपल्या दान करण्याची तयारी दाखवली त्यामुळे हे प्रत्यारोपण इतक्या कमी वेळात करणं शक्य झालं. अधिक अचूकता आणि रुग्णाला वेगाने बरं वाटावं यासाठी आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या रोबो असिस्टेड तंत्रज्ञानाचा वापर करून लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मुलीने शस्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला.’

बिर्ला हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या, ‘आमच्या हॉस्पिटलच्या टीमने रोबो असिस्टेड लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी ही अवघड शस्रक्रिया करण्याचा कठीण निर्णय घेतला याबद्दल मला आनंद आहे. लहान मुलीवर करण्यात आलेली ही पश्चिम भारतातील अशा प्रकारची पहिली शस्रक्रिया ठरली आहे. पेडिअट्रिशियन, हेपॅटोलॉजिस्ट आणि पेडिअट्रिक इंटेन्सिव्हिस्ट त्याचबरोबर लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समर्पण भावनेने काम करणारा स्टाफ अशी त्रिस्तरीय सुविधा आमच्या हॉस्पिटलने एका छताखालीच उपलब्ध करून दिल्यामुळे या लहान मुलीवर उत्तम उपचार करता आले आणि तिला लवकर बरं करणं शक्य झालं.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.