Pune News : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सारसबाग चौपाटीवरील 53 दुकानांना पालिकेने ठोकले टाळे

एमपीसी न्यूज : सारसबागेच्या चौपाटीवरील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्व 53 दुकानांना सील ठोकले. महापालिकेने सुट्टीच्या दिवशी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली होती.

सारसबागेच्या सीमाभिंतीला चौपाटी असून, तेथे फास्टफूड सेंटर, ज्यूस सेंटर, आइस्क्रीम पार्लर यांसह खेळण्यांची दुकाने थाटली आहेत. महापालिकेने येथे 53 जणांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. त्यांना स्टॉलच्या जागेपेक्षा जास्त जागा वापरता येत नाही. मात्र, या व्यावसायिकांनी स्टॉलसमोर शेड मारून फरशा टाकून स्टॉलचे रूपांतर हॉटेलमध्येच केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर अतिक्रमण करून तेथे व्यवसाय सुरू असला तरी अतिक्रमण विभागाकडून कधीतरी कारवाई केली जाते. महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर सारसबागेवर कारवाई करून स्टॉलसमोरील सर्व अतिक्रमण पाडून टाकले होते. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करू नये, यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट केले होते.

पण, याकडे दुर्लक्ष करीत तेथे पुन्हा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शनिवारी महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत 53 स्टॉलला सील केले. त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत. दरम्यान, महापालिकेला सुट्टी असताना अतिक्रमण विभागाकडून कारवाई कशी काय झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.