Pune : गणेशोत्सवात शहर राहणार ‘चकाचक’ ; दररोज दोन वेळा सफाई करण्याचा पालिकेचा निर्णय 

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत महापालिकेकडून सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा शहर स्वच्छता केली जाणार आहे. या स्वच्छतेचा आढावा थेट महापालिका आयुक्त सौरभ राव स्वतः घेणार आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागात दिल्या असून, या कालावधीत शहरात अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात देशभरातून लाखो भाविक येतात. या उत्सवाच्या कालावधीत बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे चार ते पाच लाख असते.  त्यामुळे शहरातील कचऱ्याची वाढ तीनशे ते चारशे होते. याशिवाय उत्सवासाठी वापरण्यात येणारे सजावटीचे साहित्य तसेच उत्सवाच्या कालावधीत नागरिकांकडून घराची स्वच्छता केली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाढतो. अशा स्थितीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रमुख्याने शहर स्वच्छतेसाठी दोन शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दिवस आणि रात्री स्वच्छता मोहीम राबवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी काम करण्यापूर्वीचे तसेच काम झाल्यानंतर चे फोटो देखील काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.