Pimpri : महापालिकेने एकाच दिवशी पकडली 108 डुकरे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आज (बुधवारी) एकाचदिवशी 108 डुकरे पकडली आहेत. भाटनगर, लिंकरोड, थेरगाव, डाल्को कंपनी परिसरात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात उपद्रव करणारे, आरोग्यास हानिकारक डुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने डुकरे पकडणे व त्यांची विल्हेवाट लावण्याचे कामकाज परराज्यातील ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदाराने डुकरे पकडण्यासाठी 20 कामगारांचे पथक केले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण यांच्यासह त्यांचे पोलीस कर्मचारी यांचा चमू तयार करण्यात आला. त्यानुसार डुकरे पकडण्यास सुरुवात केली. भाटनगर, लिंकरोड, डाल्को कंपनी, थेरगाव या ठिकाणी कारवाई करून 108 डुकरे  पकडण्यात आली. कारवाई करताना डुकरे पाळणा-या व्यावसायिकांनी जोरदार विरोध केला. कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या सहकार्याने आजची कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर डुक्कर मुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पुढील काही दिवस डुकरे पकडण्याची कारवाई सुरु राहणार आहे. डुक्कर मालकांनी आपली डुक्करे महापालिका हद्दीबाहेर न्यावीत, असे आवाहन महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.