Pimpri : महापालिकेला शल्यचिकित्सक, न्युरो सर्जन, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी मिळेनात

अर्ज करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्यूत्तर संस्था आणि रुग्णालयांकरिता स्थायी आस्थापनेवर भरण्यात येणाऱ्या शल्यचिकित्सक, न्युरो सर्जन, फिजिशियन सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर पदांना प्रतिसादच मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. पदांसाठी उमेदवारच न मिळाल्याने पदे भरतीला महापालिकेने पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750  खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रूग्णालयात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णांची अचडण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत. यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयांकरिता स्थायी आस्थापनेवरील विविध 70  संवर्गातील ‘गट  अ’, ‘ब’ मधील 141 रिक्त पदे  सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. त्याकरिता महापालिकेने 13 सप्टेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु, त्याला प्रतिसादच मिळाला नाही.

त्यामध्ये अधिष्ठता, शल्यचिकित्सक,  बालरोग, चिकित्सा, रेडिओलॉजी, भूलशास्त्र, अस्थिरोग चिकित्सा, मानसोपचार, पॅथॉलॉजी, त्वचारोगशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र अशी 49 विविध सहयोगी प्राध्यापकांची पदे आहेत. तसेच न्यूरो, फिजिशियन, न्यूरो सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, आन्को फिजिशन, बालरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, कार्डीऑलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी अशी गट ‘अ’, ‘ब’ संवर्गातील एकूण 141 पदे अत्यावश्यक सेवेतील आहेत. यापैकी काही पदासांठी एकही उमेदवाराचा अर्ज आला नाही. तर, काही पदासाठी एकच अर्ज आला आहे.  त्यामुळे महापालिकेने अर्ज करण्यास पुन्हा 19 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी या जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पदासांठी अर्ज करण्यास पाच दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, डिमांड ड्राफ्टची मूळप्रत महापालिकेतील प्रशासन विभागाकडे प्रत्यक्ष अथवा पोष्टाने, कुरीयरने 22 ऑक्टोबरपर्यंत सादर करावी लागणार आहे.

प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोल लोणकर म्हणाले, ”महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयांकरिता स्थायी आस्थापनेवर विविध 70  संवर्गातील गट ‘अ’, ‘ब’ संवर्गातील 141 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तथापि, अनेक पदांकरिता एकच अर्ज आला आहे. प्रत्येक पदासाठी चार अर्ज येणे अपेक्षित आहे. तर, काही पदांसाठी आजपर्यंत एकाही उमेदवाराचा अर्ज आला नाही. त्यामुळे अर्ज करण्यास 19 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.