Pune News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे – वंदना चव्हाण 

0

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालिकेने उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कमी झालेली रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

चव्हाण यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटर्स टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच महापालिकेच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनीही त्यांच्याकडील कोविड वॉर्ड बंद केले आहेत. महापालिकेने अधिग्रहीत केलेली रुग्णालयेही पुन्हा खुली झाली आहेत. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत राहिली तर ऐनवेळी प्रशासनाची धावपळ होण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि अन्य संबंधित कर्मचारी यांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा आदींचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासूनच समग्र नियोजन करावे. त्यासाठी आराखडा तयार करावा आणि तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे.’

शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ नये आणि लॉकडाऊनसारख्या उपायांना कोणालाही सामोरे जावे लागू नये, त्यासाठी महापालिकेने आतापासूनच आराखडा तयार करून अंमलबजावणीची दिशा निश्चित करण्याची गरज असल्याचे वंदना चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात रोज सरासरी 210 रुग्ण सापडत होते. मात्र 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान रोज सरासरी 140 रुग्णांची नोंद झाली. परंतु, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अनुक्रमे 384, 411 आणि 373 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कमी झालेली रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे झाले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III