Pune Metro News: पालिकेने  मेट्रोला अडथळा ठरणारी दुकाने हटवली 

The municipality removed the shops that were obstructing the Pune Metro construction.

एमपीसी न्यूज- महात्मा फुले मंडई येथे भूमीगत मेट्रोचे स्थानकाचे काम सुरू होणार असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने  मंडई इमारतीच्या परिसरातील दुकान हटवून हा परिसर रिकामा केला आहे.

महापालिकेने शनिवारी सकाळी पोलिस बंदबोस्तामध्ये दुकाने हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने व्यावसायिकांना विश्‍वासात न घेता, नोटीस न देता कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला असून, महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

मंडई परिसरात मेट्रो स्थानक येणार आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तेथील व्यवसायिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी चर्चा सुरू होती. मंडईतील व्यावसायिक त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन व्हावे यासाठी आग्रही होते.

महापालिकेने हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आणि काका हलवाई दुकानामागील जागेत किराणा दुकानदार, फळविक्रेते, पान विक्रेते यासह इतरांसाठी गाळे बांधले आहे. या व्यावसायिकांनी तेथे जावे असे पालिकेचे म्हणणे आहे.

मंडईत मेट्रो स्टेशन होणार असल्याने या भागातील अधिकृत किराणा, फळविक्रेते, पान विक्रेते या ७० दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी गाळे बांधले आहेत. त्याचे वाटप करण्यात आले आहे. या ठिकाणी काम सुरू होणार असल्याने ही जागा शनिवारी सकाळी कारवाई करून रिकामी करण्यात आली आहे. कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे.’ अशी माहित अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.