Pimpri : गणरायाच्या निरोपासाठी पालिका, पोलीस यंत्रणा सज्ज 

एमपीसी न्यूज – अनंत चतुर्दशीला उद्या (रविवारी) होणा-या गणेश विसर्जन सोहळ्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले. पिंपरी, थेरगाव आणि चिंचवड येथील घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांची नजर राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी, थेरगाव, सांगवी, वाल्हेकरवाडी, मोशी अशा 26 घाटांवार  विसर्जन करता येणार आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी, क्रीडा विभागाचे जीव रक्षक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी तसेच काही स्वयंसेवी संस्थाही यावेळी सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणार आहेत. यावेळी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रोप यांचाही वापर गरजेनुसार केला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये  1 हजार 845 गणेश मंडळे आहेत. तसेच अनेक घरगुती गणपती आहेत. याची संख्या पाहता कोणताही अनुचित  प्रकार घडू नये यासाठी शहर परिसरात 26 विसर्जन घाटांवर अग्निशामक दल व पोलीस असणार आहेत.

पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन

शहरातील गणेशोत्सव आणि काही ठिकाणचे गणेश विसर्जन शांततेत पार पडले आहे. गणेश विसर्जनासाठी मंडळांनी डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळल्यास मंडळाला  दंड होऊ शकतो असेही पोलिसांनी सांगितले.

विसर्जनावेळी घ्यावयाची काळजी

विसर्जन करताना खोल पाण्यात उतरु नका
विसर्जनासाठी घाटावरील विसर्जन हौदांचा वापर करावा
निर्माल्य घाटावर टाकू नका, मूर्ती विसर्जनासाठी अग्निशामक जवानांची मदत घ्या.
पोलीस व अग्निशामकदलाच्या जवानांना सहकार्य करा.

शहरातील महापालिकेचे विसर्जन घाट

गणेश तलाव, प्राधिकरण तळे, वाल्हेकरवाडी, जाधव घाट, रावेत घाट, जलशुध्दीकरण केंद्र,  किवळेगांव घाट, स्मशानघाट,  रावेत, भोंडवेवस्ती घाट, थेरगांव पूल नदीघाट, मोरया गोसावी, चिंचवड नदीघाट, केशवनगर, चिंचवडघाट, ताथवडे, स्मशानभूमी जवळील घाट, पुनावळे गांव, राममंदीर घाट, वाकड गावठाण घाट, कस्पटेवस्ती घाट, सांगवी स्मशानभूमी जवळील घाट,  सांगवी आहिल्याबाई होळकर घाट,  सांगवी वेताळबाबा मंदीर घाट, कासारवाडी स्मशानभूमी जवळील घाट,  फुगेवाडी, स्मशानभूमीजवळील घाट, बोपखेल घाट, पिंपरीगांव, स्मशानभूमीजवळील घाट,  काळेवाडी स्मशानभूमीजवळील घाट, पिंपळेगुरव घाट,  काटेपिंपळे घाट क्र.1, सुभाषनगर घाट, पिंपरी. पिंपळेनिलख घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशानभूमी जवळील घाट याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.