Pimpri : शहराचा नावलौकिक वाढविणा-या खेळाडूंचा महापालिका करणार गौरव

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पद्मश्री, खेलरत्न, अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करून शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या विविध क्रीडापटूंसह शहरातील खेळाडूंचा पिंपरी महापालिकेतर्फे क्रीडा दिनी गौरव करण्यात येणार आहे. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये येत्या गुरूवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महापालिकाही हा दिन साजरा करणार आहे. महापालिका क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या वतीने शहराचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचाविणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न, अर्जून, शिवछत्रपती अशा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.

त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पॅरालॉम्पिक जलतरण स्पर्धेचे विश्‍वविजेते, निवृत्त नाईक सुभेदार मुरलीकांत राजाराम पेटकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय बॉक्‍सर व अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्‍सर विजय यादव, मैदानी खेळाडू स्नेहल खैरे, पैलवान मारूती आडकर, कबड्डीपट्टू शितल मारणे, पूजा शेलार, संगीता सोनवणे, नितीन घुले, राजू घुले, शंकर काटे, ट्रायथॅलॉनमधील खेळाडू सोनाली लोणारी, सायकलपट्टू प्रतिमा लोणारी, मिनाक्षी शिंदे, दीपाली पाटील, मिलिंद झोडगे, प्रशांत झेंडे, कमलाकर झेंडे, गिर्यारोहक राजेश पाताडे, बुद्धीबळपट्टू स्वाती घाटे, शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांना देखील गौरविण्यात येणार आहे.

या सर्व मान्यवरांचा गौरव सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्‍त शहरातील 144 विद्यार्थी खेळाडूंना सन 2017-18च्या क्रीडा शिष्यवृत्तीचे धनादेश देखील वाटप करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.