BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिका 30 कोटींचे डस्ट बिन्स खरेदी करणार 

 आर्थिक तरतूद वर्गीकरणाला स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका 30 कोटींची डस्ट बिन्स खरेदी करणार आहे.  त्यासाठी अर्थसंकल्पातील दहा कोटींची तरतूद अपुरी पडत असल्याने स्थायी समितीने आज (बुधवारी) आणखी वीस कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे. याबाबतच्या आयत्या वेळच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला ओला – सुका कच-याबरोबरच घातक कचरा ठेवण्यासाठी प्रत्येकी तीन डस्ट बिन देण्याचे नियोजित आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 22 लाखांच्या घरात आहे. तर औद्योगिक, व्यापारी मालमत्तांसह निवासी मालमत्तांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. निवासी घरांमधील कचरा ओला आणि सुका या पद्धतीने विलगीकरण करून गोळा करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी सन 2015 मध्ये महापालिकेमार्फत 7 लिटर क्षमतेच्या हिरव्या आणि सफेद रंगाच्या बकेटस प्रति कुटूंब दोन याप्रमाणे 4 लाख 65 हजार कुटूंबांना वाटप करण्यात आल्या. मात्र, दोन वर्षापूर्वी वाटप केलेल्या या बकेटस पूर्ण गायब झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे ओला आणि सुका कचरा विलगीकरण धोरण पूर्णपणे फसले आहे.

ओला-सुक्या कच-यासह घातक असा कच-याचा तिसरा प्रकार केंद्र सरकारने निश्चित केला आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्ट बिन देण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. कचरा निर्माण होणा-या प्रत्येक ठिकाणी ओला, सुका व घरगुती घातक कचरा यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात येणार आहेत. हे डबे अनुक्रमे हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाचे असतील. त्यासाठी सन 2019-20  च्या अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, 10 लिटर क्षमतेचे डस्ट बिन प्रति कुटूंब तीन याप्रमाणे सव्वापाच लाख कुटूंबांना वाटण्याकामी 10 कोटींची तरतूद अपूरी पडत आहे. त्यासाठी अंदाजे 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी असलेल्या 56  कोटी रुपयांच्या लेखाशीर्षातून 20 कोटी रुपये डस्ट बिन खरेदी करणे या कामावर वळविण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3