Pimpri : महापालिका 54 हजार पाणी मीटर बदलणार 

एमपीसी न्यूज –  पिंपरी महापालिकेच्या वतीने ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली शहराच्या 40 टक्के भागातील नळजोडांवरील सुमारे 54 हजार पाणी मीटर बदलण्यात येणार आहेत. त्यामध्ये निगडीगावठाण, भोसरी गावठाण, संभाजीनगर, रावेत, चिंचवडगाव, नवी सांगवी, जुनी सांगवी, मासुळकर कॉलनी आदी भागांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजनेत (जेएनएनयुआरएम)  सन 2007 मध्ये सहभाग झाला. या योजनेतील समावेशाची अट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 1 एप्रिल 2009 पासून शहरात पाणी मीटर पद्धत लागू केली आहे.  झोपडपट्टी परिसरातील सुमारे सात हजार नळजोड वगळता इतर भागामध्ये 1 लाख 38 हजार 782 नळजोडांना महापालिकेने पाणीमीटर बसविले. चेतास कंट्रोल प्रा. लि. यांच्याकडून हे पाणी मीटर बसवून घेण्यात आले. त्यावर सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे.

पहिल्या टप्प्यात शहराच्या 40 टक्के भागात चोविस तास पाणी पुरवठ्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, केंद्र, राज्य आणि महापालिकेतही सत्ता बदल झाला. सत्तेवर आलेल्या भाजपने 40 टक्के भागात जेएनएनयुआरएम अंतर्गत तर उर्वरीत 60 टक्के भागात अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. चोवीस तास पाणी पुरवठ्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. नवीन जलवाहिनी टाकणे, त्याला उपवाहिन्या जोडणे, नळजोड बदलणे आदी कामाचा त्यात समावेश आहे.

जेएनएनयुआरएम अंतर्गत शहरातील 40 टक्के भागात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 144 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. या खर्चापैकी 30 टक्के  43 कोटी रुपयांचा हिस्सा महापालिका उचलणार आहे. केंद्राकडून 71 कोटी 59 लाख तर राज्य शासनाकडून 28 कोटी 63 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. मात्र, त्यामध्ये पाणी मीटर बदलण्यासाठी होणारा खर्च गुलदस्त्यात ठेवला आहे.

याबाबत बोलताना पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ‘चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील 40 टक्के भागात ‘स्पेसिफाईड’ कंपन्यांचे पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. यापूर्वी बसविण्यात आलेले पाणी मीटर जुने झाले आहेत. तसेच नादुरुस्त देखील झाले आहेत. त्यामुळे नळजोडांवर नवे मीटर बसविण्यात येत आहेत. रिडिंग पद्धत पूर्वीच्या मीटरप्रमाणेच असणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.